“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान – टप्पा क्र.१” च्या अनुषंगाने लोणी काळभोर अपर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मंडल निहाय चार ठिकाणी समाधान शिबिरांचे आयोजन
शनिवार ७ मार्च पासून सुरू होणाऱ्या शिबिरांचा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा - तहसिलदार तृप्ती कोलते

पुणे : राज्यशासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान – टप्पा क्र.१” च्या अनुषंगाने नागरीकांच्या दैनंदिन प्रश्नांचे त्वरित निराकरण करण्यासाठी लोणी काळभोर अपर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील मंडल निहाय चार ठिकाणी समाधान शिबिरांचे आयोजन येत्या शनिवार (ता. ७) पासून करण्यात येणार आहे.
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे त्वरित निराकरण करण्यासाठी वाघोली, अष्टापूर, उरुळीकांचन व थेऊर या मंडल कार्यालयाअंतर्गत चार शिबिरांचे आयोजन केले आहे.
या शिबिरांच्या वेळापत्रकानुसार पहिले शिबीर येत्या शनिवारी, दि.७ मार्च रोजी – वाघोली मंडल कार्यालयाअंतर्गत केसनंद येथे महादेव मंदिराशेजारी होईल. तर शनिवारी, दि.१४ मार्च रोजी – अष्टापूर मंडल कार्यालयाअंतर्गत अष्टापूर येथे ग्रामपंचायत सभागृहात होईल. तिसरे शिबीर शुक्रवार, दि.१० एप्रिल रोजी उरुळी कांचन मंडल कार्यालया अंतर्गत सोरतापवाडी येथे होईल. तर शेवटचे शिबीर १७ एप्रिल रोजी थेऊर मंडल कार्यालया अंतर्गत कोलवडी येथे होईल.
या शिबिरांमध्ये प्रशासनाकडून विविध महसुली सेवा व शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिबिरांमध्ये देण्यात येणाऱ्या प्रमुख सेवामध्ये भोगवटावर्ग २ जमिनी भोगवटा वर्ग १ मध्ये रूपांतर व दुरुस्त 7/12 वाटप,
प्रलंबित फेरफार नोंदी निकाली काढून अद्ययावत 7/12 वितरण, तुकडेबंदी कायद्याविरोधातील व्यवहारांची गावनिहाय यादी, भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी दप्तर अद्ययावत करणे, ‘जिवंत 7/12’ मोहिमेअंतर्गत नोंदी पूर्ण करणे, अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क, सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत प्रलंबित लाभार्थ्यांची यादी करणे, सामाजिक अर्थसहाय्य योजना अर्ज व मंजुरी आदेश वितरण, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना, विद्यार्थ्यांना प्रलंबित दाखल्यांचे वाटप, पाणंद रस्ते प्रशासकीय मान्यता आदेश वितरण,
लोकलेवा हक्क कायद्यानुसार तात्काळ सेवा प्रमाणपत्रे वितरण, अकृषिक तरतुदी संदर्भातील मार्गदर्शन, ॲग्रिस्टॅक, पीएम किसान, ई-केवायसी संदर्भातील कामकाज, अशा विविध योजनांसह नागरीकांची अनेक कामे मार्गी लागणार आहेत.
तसेच या अभियानामुळे महसूल प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत होऊन प्रलंबित प्रश्नांना गती मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
त्यानुसार सर्व लोकप्रतिनिधी, महिला बचत गट, युवक मंडळे तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोणीकाळभोर अपर तहसील कार्यालयाच्या तहसिलदार तृप्ती कोलते यांनी केले आहे.
…….



