वाघोली-भावडी रस्त्याची दुरवस्था; नागरिकांचे हाल

वाघोली-भावडी रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची जनसेवक संपतआबा गाडे यांची मागणी

पुणे : वाघोली-भावडी रस्त्याची जड वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, पावसामुळे रस्त्यावर चिखल, खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याची तातडीने पाहणी करून दुरुस्ती करण्याची मागणी जनसेवक संपत आबा गाडे यांनी शासन व संबंधित प्रशासनाकडे केली आहे.

जनसेवक संपत गाडे यांनी नुकतीच वाघोली-भावडी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी रस्त्याची अत्यंत खराब अवस्था झाल्याचे निदर्शनास आले. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मार्गक्रमण करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

या रस्त्यालगत मोठ्या संख्येने नागरिक व रहिवासी वास्तव्यास आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक रहिवाशांचे रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आपल्याला फोन येत असून, पावसाळ्यात या मार्गाने ये-जा करणे अत्यंत त्रासदायक होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत असल्याचेही संपतआबा गाडे यांनी नमूद केले.

विशेषतः दुचाकीस्वारांना खड्डे आणि चिखलामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तसेच शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि कामानिमित्त दररोज या रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात रस्त्याची परिस्थिती आणखी गंभीर होत असल्याने प्रशासनाने केवळ पाहणी न करता तातडीने प्रत्यक्ष काम सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने होत असल्याचे गाडे यांनी सांगितले.

“वाघोली-भावडी रस्त्याची सध्याची अवस्था पाहता नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पीडब्ल्यूडी, बांधकाम विभाग किंवा पुणे महानगरपालिकेसह या रस्त्याची जबाबदारी असलेल्या संबंधित विभागांनी तातडीने दखल घेऊन तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी,” अशी मागणीही जनसेवक संपत आबा गाडे यांनी केली आहे.

नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग असलेल्या या रस्त्याची तातडीने डागडुजी करून खड्डे बुजवावेत, पाणी साचणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी करतानाच, प्रशासनाने नागरिकांची ही समस्या गांभीर्याने घेवून येत्या आठ दिवसांत रस्ता दुरुस्तीचे काम हाती न घेतल्यास प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही संपत आबा गाडे यांनी दिला आहे.

……

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button