शिक्षक व्यवस्थापन प्रणाली विकसित करणारे पुणे डायट राज्यातील पहिले शासकीय संस्थान
प्रशिक्षण प्रक्रिया ऑनलाइन; प्रमाणपत्रावर क्यूआर कोड, डुप्लिकेशनला आळा : डॉ. नामदेव शेंडकर

शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिक्षक प्रशिक्षण प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), पुणे यांनी प्रशिक्षण शिक्षक व्यवस्थापन प्रणाली (टीएमएस) विकसित केली आहे. अशी प्रणाली विकसित करणारे पुणे डायट हे महाराष्ट्रातील पहिले शासकीय संस्थान असल्याची माहिती डायटचे प्राचार्य डॉ. नामदेव शेंडकर यांनी दिली.
शिरूर येथील विद्याधाम प्रशालेच्या सभागृहात पंचायत समिती शिक्षण विभाग आणि शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुख्याध्यापक सहविचार सभेत ते बोलत होते. डायटच्या आयटी व प्रसारमाध्यम विभागाचे प्रमुख डॉ. विकास गरड यांनी सन २०२५-२६ व २०२६-२७ या कालावधीत ही प्रणाली विकसित केली आहे.
या प्रणालीद्वारे पुणे जिल्ह्यातील सर्व शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम एकाच ऑनलाइन व्यासपीठावर आणण्यात आले आहेत. शिक्षकांची उपस्थिती नोंदविण्यापासून प्रशिक्षणानंतरचे कार्यामुक्ती प्रमाणपत्र व प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यापर्यंतची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षक प्रशिक्षणाची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत आहे.
प्रमाणपत्रावर स्वयंचलित पद्धतीने प्रमाणपत्र क्रमांक तयार होत असल्याने त्याचे डुप्लिकेशन करणे शक्य होत नाही. तसेच प्रमाणपत्रावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित शिक्षकाने पूर्ण केलेल्या प्रशिक्षणाची माहिती सहज उपलब्ध होते. या ऑनलाइन प्रणालीमुळे पुणे जिल्ह्यातील शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होत असल्याचे डॉ. शेंडकर यांनी सांगितले.
पुणे जिल्हा गुणवत्ता विकासात मार्गदर्शक
पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी तसेच विविध शिष्यवृत्तीविषयक उपक्रमांमुळे पुणे जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात मार्गदर्शक ठरत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा आणि विविध स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी असल्याचेही डॉ. शेंडकर यांनी नमूद केले.
प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासोबतच शालेय आस्थापनेशी संबंधित कामकाज अधिक प्रभावी, पारदर्शक आणि गतिमान करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रीतम कोकणे, शिक्षण विस्तार अधिकारी किसन खोडदे, रघुनाथ पवार तसेच शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य रामदास थिटे यांनी प्री-मॅट्रिक, समाजकल्याण शिष्यवृत्ती, व्हीएसके, प्रशस्त ॲप, सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती, निपुण महाराष्ट्र, नवभारत साक्षरता, संच मान्यता, आधार वैधता, इको क्लब आदी विविध शैक्षणिक व प्रशासकीय उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास मुख्याध्यापक संघाचे सचिव बाळासाहेब चव्हाण, कार्याध्यक्ष नामदेव चौधरी, उपाध्यक्ष प्रकाश गावडे, रामनाथ इथापे, गुलाबराव डाळिंबकर, बाळासाहेब सोनवणे, प्राचार्य मारुती कदम, राजाराम ढवळे, राजेश सोनावणे, संतोष दौंडकर, अशोक दहिफळे, प्राचार्य वनवे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पुणे विभाग प्रमुख प्राचार्य अनिल साकोरे, सेकंडरी सोसायटीचे संचालक प्राचार्य तुकाराम बेनके, राज्य आश्रमशाळा महासंघाचे उपाध्यक्ष तुकाराम शिरसाट, समाजकल्याण विभागाचे समन्वयक किरण बोडके, संदीप क्षीरसागर, केंद्रप्रमुख तसेच विविध प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. प्राचार्य रामदास थिटे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी सूत्रसंचालन केले, तर कार्याध्यक्ष नामदेव चौधरी यांनी आभार मानले.



