विसर्जन मिरवणुकीत वाघोली पोलिसांचे ‘ट्रॅफिक प्लॅनिंग’ यशस्वी, नगर महामार्गावर वाहतूक सुरळीत;
पोलिसांच्या नियोजनाचे नागरिकांकडून कौतुक, वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांचा नागरिकांच्या वतीने सत्कार
पुणे : वाघोलीत गणेश विसर्जन मिरवणूकीसाठी यंदा वाघोली पोलिसांनी केलेले सुरेख नियोजन, मिरवणुकीसा ठी हमरस्त्याऐवजी बदललेला अंतर्गत मार्ग तसेच महापालिका प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि गणेश मंडळांच्या समन्वयामुळे प्रथमच पुणे–अहिल्यानगर महामार्गावर वाहतूक कोंडी न होऊ देता गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत संपन्न करण्यात यश आले. पोलिसांच्या या नियोजनाचे समाजमाध्यमांसह नागरिकांकडून कौतुक होत असून, वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड तसेच सहयोगी अधिकाऱ्यांचा नागरिकांच्या वतीने प्रतिनिधिक सत्कार, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सातत्याने पुढाकार घेणारे जनसेवक संपतआबा गाडे, तसेच पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेशबापू सातव यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. तर माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनीही श्री.गायकवाड यांचे अभिनंदन केले.

दरवर्षी वाघोलीतील मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीमुळे पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. यंदा मात्र पोलिसांनी आव्हाळवाडी फाटा–गावठाण–लोहगाव चौक–वाघेश्वर मंदिर असा अंतर्गत मार्ग निश्चित केल्याने मिरवणुकीचा महामार्गावरील वाहतुकीवर होणारा परिणाम कमी झाला.
महिनाभरापासून नियोजन
नवीन विसर्जन मार्गावरील अडथळे दूर करण्यासाठी वाघोली पोलिसांनी मागील महिनाभरापासून महापालिका, महावितरण, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. विद्युत तारांची उंची वाढविणे, अडथळा ठरणारे विद्युत खांब हटविणे, रस्त्यावरील खड्डे बुजविणे, आवश्यक ठिकाणी डांबरीकरण करणे आणि अतिक्रमणे हटविणे आदी कामे करण्यात आली. त्यामुळे मिरवणूक मार्ग वाहतुकीसाठी सुलभ झाला.

पोलिसांनी सर्व अवजड वाहने वाघेश्वर मंदिर चौकातून भावडी रस्ता मार्गे लोणीकंदला वळविली होती. उलट दिशेची वाहतूकही वळविल्याने अंतर्गत रस्त्यावर मिरवणुकीचा जल्लोष सुरू असताना महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहिली.यात पोलिस, वाहतूक विभाग, गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवक यांच्या योग्य समन्वय ही प्रभावी मुद्दा ठरला.
विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस दलाचे २० अधिकारी आणि १८० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तर परिमंडळ सातचे उपायुक्त अबिनाश कुमार, सहायक पोलिस आयुक्त अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलिस निरीक्षक पल्लवी मेहेर आणि वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त किशोर तनपुरे यांनी बंदोबस्त व वाहतुकीचे प्रभावी नियंत्रण केले. मिरवणूक मार्गावरील अडथळे हटवण्यासाठी नगरसेवकांनीही परिश्रम घेतले. मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.
रोजच्या वाहतूक कोंडीसाठीही ‘अॅक्शन प्लॅन’ची अपेक्षा
विसर्जन मिरवणुकीसाठी ज्या पद्धतीने विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधून वाहतूक व्यवस्थापन करण्यात आले, त्याच धर्तीवर वाघोलीतील दैनंदिन वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीही कायमस्वरूपी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. विशेषतः पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील गर्दीच्या ठिकाणी वाहतुकीचे नियोजन, अतिक्रमणे आणि अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण तसेच विविध विभागांमध्ये सातत्याने समन्वय ठेवण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली.
‘समन्वयामुळेच वाहतूक कोंडीवर नियंत्रण’
“वाघोलीतील गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहपूर्ण वातावरणात आणि शांततेत पार पडली. पोलिसांनी केलेले नियोजन, बदललेला मिरवणूक मार्ग तसेच पोलिस, महापालिका प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि गणेश मंडळांच्या समन्वयामुळे मागील वर्षाच्या तुलनेत पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवण्यात यश आले. याचे समाधान आहे.”
— नंदकुमार गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाघोली.



