सुंदरबन क्लस्टरला देशात अग्रस्थानी नेण्यासाठी पाठबळ देवू : सीईओ रुप राशी

केवायआयसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुप राशी यांची न्हावरे (ता. शिरुर, जि. पुणे) येथील ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेच्या सुंदरबन फळे व पालेभाज्या प्रक्रिया क्लस्टरला भेट; शेतकरी, महिला व कारागिरांच्या उत्पन्नवाढीबद्दल क्लस्टरचे केले कौतुक. 

पुणे : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अन्नसुरक्षा मानकांनुसार उत्पादने तयार करून ती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचविण्याची क्षमता सुंदरबन क्लस्टरने निर्माण केली असून उत्तम दर्जाचे उत्पादन व प्रभावी ब्रँडिंग ही क्लस्टरची गुणवत्ता दर्शविणारी बाब असल्याचे गौरवोद्गार खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या (केवायआयसी) मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. रुप राशी यांनी काढले. तसेच शेतकरी व कारागिरांद्वारे दर्जेदार उत्पादन, प्रक्रिया व मुल्यवर्धन करणाऱ्या सुंदरबन क्लस्टरला देशातील प्रथम क्रमांकाचे क्लस्टर बनवण्यासाठी सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

      न्हावरे (ता. शिरुर, जि. पुणे) येथील ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेच्या सुंदरबन फळे व पालेभाज्या प्रक्रिया क्लस्टरला खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या (केवायआयसी) मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. रुप राशी यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पदाधिकारी, अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

       यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या, ‘सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘सुंदरबन’ ब्रँडचा विस्तार करून अधिकाधिक शेतकऱ्यांचा शेतमाल प्रक्रियेत आणणे, त्यांना चांगले उत्पन्न व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि जीवनमान उंचावणे, हा क्लस्टरचा उद्देश कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले. तर सौरऊर्जेसारख्या हरित ऊर्जेचा वापर करून कमी खर्चात उत्पादन घेऊन सुंदरबनला प्रदूषणमुक्त क्लस्टर म्हणूनही नवी ओळख मिळवून देता येईल. त्यासाठी विविध शासकीय विभागांशी समन्वय साधण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनांमध्ये सुंदरबनच्या उत्पादनांचा सहभाग वाढविण्यासाठीही सहकार्य केले जाईल, असेही आश्वासन त्यांनी दिले.

      दरम्यान क्लस्टरमध्ये महिलांच्या सक्रिय सहभागाचेही त्यांनी कौतुक केले. महिलांच्या हातात थेट उत्पन्न गेल्यास त्यांना आर्थिक नियोजन करता येईल. त्यातून मुलांचे शिक्षण, आरोग्य व कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. आयुष मंत्रालयासह विविध शासकीय विभागांशी समन्वय साधून ‘सुंदरबन’ हा मोठा ब्रँड निर्माण करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

    खादी व ग्रामोद्योग आयोगाचे राज्य संचालक योगेश भामरे म्हणाले की, पिकांचे नियोजन, उपलब्ध कच्चा माल, उत्पादनाचे लक्ष्य आणि शेतकऱ्यांच्या अडचणी यांचा नियमित आढावा घेणे आवश्यक आहे. त्यानुसार पिकांचे नियोजन केल्यास एकाच कच्च्या मालाचे अतिरिक्त उत्पादन टाळता येईल आणि शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यास मदत होईल. क्लस्टरचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांनाही त्याची माहिती देऊन त्यांना क्लस्टरशी जोडावे. नियमित बैठका घेऊन कच्च्या मालाचे नियोजन तसेच प्रक्रिया उत्पादनात शेतकऱ्यांचा सहभाग वाढविल्यास कुशल मनुष्यबळही निर्माण होईल. शेतकरी हा क्लस्टरचा आत्मा असून, उत्पादनाच्या स्वच्छतेसाठीही शेतकऱ्यांनी योग्य प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे, असे भामरे यांनी स्पष्ट केले.

     ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरविंद शाळिग्राम यांनी कच्च्या मालापासून उत्तम दर्जाचे उत्पादन तयार करण्यापर्यंतच्या गुणवत्तेच्या विविध टप्प्यांची माहिती दिली. पुणे विद्यापीठात क्लस्टरचे संशोधन व विकासाचे काम सुरू असून, प्रत्येक उत्पादनाचे लेखापरीक्षण व प्रमाणन करूनच त्यानुसार उत्पादनाची विक्री केली जाते. भविष्यात अधिकाधिक शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यावर भर द्यावा. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सेंद्रिय उत्पादनांना चांगली मागणी व किंमत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

    सुंदरबन क्लस्टरचे अध्यक्ष गिताराम कदम यांनी आतापर्यंत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. विद्यापीठातील विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी व शेतकऱ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्याबरोबरच सेवा म्हणून त्यांच्या मालावर प्रक्रिया करून दिली जाते. शेतकरी स्वतःचा माल क्लस्टरमध्ये आणून त्यावर प्रक्रिया व ब्रँडिंग करीत आहेत. कौशल्य प्रशिक्षण, सेवा, रोजगारनिर्मिती आणि उत्पादन ही क्लस्टरची उद्दिष्टे पूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

    या वेळी अरविंद शिंदे, तुकाराम मचाले, महिपती काळे, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातील विद्यार्थी व सुरेखा शिंदे यांनी क्लस्टरचा झालेला फायदा व अनुभव कथन केला. सुंदरबनचे संचालक युवराज जगताप, सुशील येवले व जयंती कदम यांनीही क्लस्टरच्या कामकाजाची माहिती दिली.

   कार्यक्रमास एस.एम. फाउंडेशनचे प्रमोद पाटोळे, उमेद संस्थेच्या नम्रता कदम, महादेव सोनवणे, प्रमोद पानसरे, बाबुराव दौंडकर संस्थेचे दत्तात्रय दरेकर यांच्यासह क्लस्टरचे महिला व पुरुष सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले. संस्थेचे संचालक युवराज जगताप यांनी आभार मानले.

—————–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button