वाढदिवसाला ज्ञानाची भेट; पेरणे येथे वाढदिवसाचा खर्च टाळून सलग तीन वर्ष सरडे व कवडे परिवाराकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
जिल्हा परिषद सदस्य पै. किरणपेठ साकोरे, पंचायत समिती सदस्या राणी दत्ताआबा वाळके यांच्यासह मान्यवराकडून उपक्रमाचे कौतुक

पुणे : वाढदिवसाचा आनंद केवळ केक कापून साजरा न करता तो गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलविण्याचा अनोखा उपक्रम पेरणे येथील चि.रोचित रोहित कवडे याच्या वाढदिवसानिमित्त सरडे वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राबविण्यात आला. यावेळी शाळेतील ६० विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, लेखन साहित्य, मिठाई तसेच शाळेला कलर प्रिंटर देण्यात आला.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नातवाच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून पेरणे (ता. हवेली) येथील सरडे व कवडे परिवाराकडून सलग तिसऱ्या वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपाच्या या विधायक उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. उद्योजक हरिभाऊ सरडे व माजी उपसरपंच रेखा सरडे यांचा रोचित नातू आहे. तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन सौ.चैत्राली व रोहित कवडे या चि.रोचितच्या आई वडीलांनी गेले तीन वर्षे सातत्याने हा शैक्षणिक मदतीचा उपक्रम राबविला आहे.

कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य पै. किरणपेठ साकोरे, पंचायत समिती सदस्य राणी दत्ताआबा वाळके, तंटामुक्ती उपाध्यक्ष दशरथ वाळके, उपसरपंच गणेश येवले, सदस्या अंकिता हनुमंत सरडे, अशोक सरडे, दीपक ढगे, सिद्धेश्वर प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष शिवाजी वाळके, महसूल अधिकारी संतोष इडोळे, कर्मचारी स्वप्निल चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी किरणशेठ साकोरे व राणी वाळके यांनी या उपक्रमाचे कौतुक करत शाळेसाठी नवीन वर्गखोली उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमप्रसंगी शिक्षक किरण खैरे व ललिता सरडे यांनी स्वागत केले. तर संतोष देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षक किरण खैरे यांनी उपक्रमाचे आयोजन केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण सरडे यांनी आभार मानले.
वाढदिवसा निमित्त इतरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याच्या या विचाराला सरडे व कवडे परिवारानेकृतीची जोड देत राबविलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसोबतच सामाजिक बांधिलकीची प्रेरणाही वृद्धिंगत झाल्याचे यावेळी जिल्हा परिषद सदस्य किरणशेठ साकोरे यांनी सांगितले.
…………



