कोरेगाव भीमा येथे मशाल मोर्चा व लाक्षणिक उपोषण करून सर्व जाती-धर्मियांचा मराठा आंदोलनाला पाठिंबा
सामाजिक एकतेसाठी ग्रामस्थांचा पुढाकार ही कौतुकास्पद बाब - पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर
कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजासह सर्व जाती-धर्माच्या नागरिकांनी सामाजिक एकतेचा संदेश देत मशाल मोर्चात सहभाग घेतला. तर आज एक दिवसीय उपोषण आंदोलन करीत मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण उपोषणास पाठिंबा व्यक्त केला.
मराठा आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी कोरेगाव भीमा येथील मराठा समाजाच्या वतीने काल रात्री मशाल मोर्चा काढण्यात आला. हातात मेणबत्या, मशाल व मोबाईल टॉर्च घेवून प्रामुख्याने युवावर्गासह ज्येष्ठ व महीलावर्गही माेर्चात सहभागी झाले होते. यावेळी छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती श्री संभाजी महाराज,एक मराठा लाख मराठा, मराठा आरक्षण याविषयी घोषणा देण्यात आल्या. सामाजिक एकतेचा चांगला संदेश देत या मोर्चाला मराठा समाजासह इतर जाती धर्मातील लोकांनीही पाठिंबा दिला. माेर्चात तरुणांसह महिला व ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती. पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस उपनिरीक्षक डोंगरे, अविनाश थोरात , कॉन्स्टेबल सचिन मोरे,व इतर पोलीस बांधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
तर आज कोरेगावातील वढु रस्ता चौकात सरपंच व ग्रामपंचायत आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह अनेक ग्रामस्थांनी सहभागी होत दिवसभर लाक्षणिक उपोषण केले. मशाल मोर्चा व उपोषण आंदोलनात सकल मराठा बांधव एकवटल्याने सर्व आजी माजी पदाधिकारी, महिला भगिनी, ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवर आंदोलनात सहभागी झाले होते. तर गावातील सिध्देश्र्वर भजनी मंडळ व माऊली भजनी मंडळाच्यावतीने भजन करुन आंदोलनास पाठिंबा दिला. शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या हस्ते सायंकाळी उपाेषण सोडण्यात आले.
बारा बलुतेदारांसह इतर धर्मियांचा पाठिंबा
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण उपोषणाला पाठिंब्यासाठी कोरेगाव भीमा येथे मराठा बांधवांकडून केलेल्या उपोषण आंदोलनात मराठा बांधवांसह बारा बलुतेदार व इतर जाती धर्मीय नागरिकांनीही सहभाग घेत पाठिंबा दिला. कोरेगावात सामाजिक सलोखा जपण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार ही कौतुकास्पद बाब असल्याचे मत शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी यावेळी व्यक्त केले.
……..