विवाह समारंभात सत्कार व भाषणबाजीला फाटा देत मुहूर्तावर लग्न लावणाऱ्या पालकांचे मान्यवरांकडून कौतुक
आदर्श विवाह आचारसंहितेचे पालन करणाऱ्या परिवारांचे शिवम प्रतिष्ठानचे प्रमुख इंद्रजीत काका देशमुख तसेच प्रबोधन केंद्र प्रमुख उत्तमराव भोंडवे यांच्याकडून सन्मान

पुणे : सध्या विवाह समारंभात वाढते अवास्तव सत्कार व भाषणबाजीला फाटा देत आदर्श विवाह आचारसंहितेचे उत्कृष्टपणे पालन करून कोरेगाव भीमा येथील ढेरंगे परिवार व पिंपरी सांडस येथील भोरडे परिवाराने अत्यंत निर्धारपूर्वक नियोजित मुहूर्तावर लग्न लावल्याबद्दल परिसरातून दोन्ही परिवारांचे कौतुक होत आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील निवृत्त नायब तहसिलदार स्व. शहाजीदादा रामचंद्र ढेरंगे यांचे सुपुत्र चि. प्रतिक व पिंपरी सांडस (ता. हवेली) येथील चंद्रकांत भिमराव भोरडे यांची सुकन्या चि. सौ. कां. निकिता यांचा शुभविवाह पेरणे फाटा येथील गोल्डन पॅलेस मंगल कार्यालयात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात संपन्न झाला. याप्रसंगी एकच सन्मान करण्यात आला.

शेजारच्या कार्यालयात डिजेचा दणदणाट सुरु असताना येथे मात्र मंगलमय वातावरणात व नियोजित वेळेत हा लग्नसोहळा संपन्न झाल्याने या प्रसंगी उपस्थित माजी सरपंच आबासाहेब गव्हाणे, जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रदीपभाऊ कंद, पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे, जिल्हा परिषद सदस्या मांढरे आदी मान्यवरांनी वेळेचे भान राखत थोडक्या वेळेत शुभेच्छा देत दोन्ही परिवाराचे कौतुकही केले. ………
‘विवाह समारंभात डिजे मिरवणुका, तरुणाईचा धांगडधिंगा, तसेच ओगळवाण्या प्री-वेडिंगचे प्रदर्शन, असे प्रकार टाळण्याचा निर्धार आम्ही दोन्ही परिवाराने केला व सर्वांच्या सहकार्याने तो अंमलातही आणला. यजमान परिवारांनी निर्धाराने ठरविल्यास मुहुर्तावर लग्न लावणे सहज शक्य आहे. ………..
विवेक ढेरंगे, उद्योजक, सचिव-शिरूर-हवेली प्रासादिक दिंडी.

…………तर ‘विवाह समारंभात कर्णकर्कश्श डिजेच्या मिरवणुका, अवास्तव सत्कार तसेच रटाळ भाषणबाजीमुळे विवाहाला मुहुर्तापेक्षाही प्रचंड विलंब होत असल्याने येणाऱ्या पाहुण्यांचा मोलाचा वेळ वाया जातो. मात्र ढेरंगे परिवाराने आदर्श पद्धतीने वेळेत विवाह समारंभ संपन्न करून समाजापुढे आदर्श उभा केला आहे, असे सांगत शिवम प्रतिष्ठानचे प्रमुख इंद्रजीत काका देशमुख यांनीही प्रत्यक्ष ढेरंगे परिवाराच्या घरी भेट देऊन त्यांचे कौतुक केले. यावेळेस शिवम परिवाराचे अनेक साधकही उपस्थित होते.
………..

दरम्यान अत्यंत निर्धाराने अनिष्ट रूढींना फाटा देत आदर्श पद्धतीने वेळेत विवाह संपन्न करणाऱ्या ढेरंगे, भोरडे, कंद तसेच मोहिते परिवाराचा पेरणे येथे प्रबोधन केंद्राच्या वतीने देखील सन्मान करण्यात आला. प्रबोधन केंद्राचे प्रमुख उत्तमराव भोंडवे यांच्या पुढाकाराने संत तुकाराम अभ्यासिकेत संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाला वेळेत उपस्थित राहीलेल्यांचा देखील सन्मान करण्यात आला.
………..



