विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासन सज्ज
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख तसेच पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी घेतला तयारीचा आढावा
(कौस्तुभ शिंदे-विशेष प्रतिनिधी)
कोरेगाव भीमा, ता. ३० : पेरणेफाटा (ता. हवेली) येथे विजयस्तंभ अभिवादन दिन कार्यक्रमासाठी पोलिस प्रशासनासह जिल्हा प्रशासनाचे सर्व विभाग सज्ज झाले आहेत. आज जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, यांनी पोलिस आयुक्त रितेश कुमार व इतर अधिकाऱ्यांमवेत विजयस्तंभ स्थळी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. दरम्यान आजपासूनच पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्यामुळे विजयस्तंभ परिसराला अक्षरशः छावणीचे स्वरुप आले आहे.
कोरेगाव भीमा नजिक पेरणेफाटा (ता. हवेली) येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी ३१ डिसेंबर व १ जानेवारी २०२४ रोजी येणाऱ्या आंबेंडकरी अन्वयांची येणारी वाढीव संख्या लक्षात घेऊन पुरेशी व्यवस्था प्रशासनाने केली आहे. तर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने सुद्धा प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
देशभरातून येतात अनुयायी….
मानवंदना कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह देशभरातून आंबेडकरी अनुयायी येत असतात. यामध्ये प्राधान्यानेविदर्भ, नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ या भागातून जास्त प्रमाणात जनसमुदाय येतो. तसेच मुंबई, पिंपरी चिंचवड, भोसरी या भागातून देखील मोठ्या संख्येने अनुयायी येत असतात. यावर्षी येणाऱ्या अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने चूक नियोजन केलेले आहे.
विजयस्तंभ अभिवादनासाठी येण्या जाण्यासाठी प्रशस्त व्यवस्था….
यावर्षी येणाऱ्या अनुयायांची वाढीव संख्या लक्षात घेऊन अभिवादन करताना गर्दी होऊ नये या दृष्टीने प्रशासनाने विजयस्तंभ परिसरात प्रवेश करण्यासाठी गतवर्षीपेक्षा वाढीव म्हणजेच प्रवेशासाठी पाच मार्ग तर बाहेर पडण्यासाठी सहा मार्ग अशी प्रशस्त व्यवस्था केली आहे.
३१ डिसेंबर पासूनच कार्यक्रम
विजयस्तंभास रात्री १२ वाजता सामुहीक बुध्द वंदना , त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे. तर सकाळी सहा वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व नितीन राऊत हे विजयस्तंभास मानवंदनेसाठी येणार आहेत. त्यानंतर समता सैनिक दलाच्या २५० जवानांची मानवंदना होणार असुन भिमगितांचे कार्यक्रमही यावेळी होणार आहे
प्रशस्त पाकिंग :
पुणे बाजूने येणाऱ्या अनुयायांच्या वाहनासाठी प्रशस्त पाकिंग : लोणीकंद आपले घर, खंडोबा माळ, फुलगाव सैनिक शाळा, शिक्रापूर येथे तोरणा पार्किंग, जीत ढाब्यासमोर, अशा विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर नगर बाजूने येणाऱ्या वाहनांसाठीही शिक्रापूर व सणसवाडी परिसरात प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे
पुणे ग्रामीण पोलीसांकडून बंदोबस्त
अप्पर पोलीस अधीक्षक ७, उपविभागीय पोलीस अधिकारी १९, पोलीस निरीक्षक ६८, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक २१७, पोलीस कर्मचारी २४८२, एसआरपीएफ प्लाटून १२ (३६० कर्मचारी), असे एकूण ३२०७ पोलीस अधिकारी व कर्मचारी.
शहर पोलीसांचाही चोख पोलिस बंदोबस्त
■ अपर पोलिस आयुक्त ५, पोलिस आयुक्त १५, सहायक पोलिस आयुक्त २१, पोलिस निरीक्षक ९०, सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक २५०, पोलिस कर्मचारी ४०००, एसआर- पीएफ कंपनी ८. बॉम्ब शोध-नाशक पथक १५, जलद शीघ्र कृती दल पथक ५, १ हजार होमगार्ड, असे एकूण ४३०८ पोलिस अधिकारी व कर्मचारी असा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अभिवादन सोहळा उत्साहात आणि शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांकडून संपुर्ण खबरदारी घेण्यात येत आहे. सोहळ्यादरम्यान ड्रोन वापरण्यास मनाई आहे. मात्र शहर पोलिसांकडून ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
पुणे-नगर महामार्ग आजपासून बंद
अभिवादन कार्यक्रमास यावर्षी येणाऱ्या अनुयायांची मोठी संख्या लक्षात घेऊन कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी यावर्षी ३० डिसेंबर २०२३ सायंकाळी ५ वाजलेपासून १ जानेवारी रात्री १२ वाजेपर्यंत पुणे-नगर महामार्ग बंद राहणार असल्याने या ठिकाणची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
मद्यविक्री दोन दिवस बंद
■ विजयस्तंभ कार्यक्रमाच्या पार्श्वभुमीवर हवेलीतील वाघोली, लोणीकंद, पेरणेफाटा तसेच शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा, शिक्रापूर या ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मद्य विक्री ३१ तारखेला सायंकाळपासून बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.