घोडनदी बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. विकास बाळासाहेब फडतरे; नव्या कार्यकारिणीची निवड
पायाभूत सुविधा आणि सदस्यांच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू- ॲड.विकास फडतरे.

पुणे : घोडनदी बार असोसिएशनच्या सन २०२६-२७ या वर्षासाठीच्या नवीन कार्यकारिणीची निवड शुक्रवारी (दि. ३१ जुलै) अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडली. अध्यक्षपदाच्या अटीतटीच्या लढतीत ॲड. विकास बाळासाहेब फडतरे यांनी ॲड. भोलेनाथ पडवळ यांचा पराभव करून अध्यक्षपदावर विजय मिळविला.
अध्यक्षपदासाठी ॲड. विकास फडतरे आणि ॲड. भोलेनाथ पडवळ यांच्यात थेट सामना झाला होता. मतदानानंतर झालेल्या मतमोजणीत ॲड. विकास फडतरे यांना बहुमत मिळाल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या विजयाची घोषणा केली. निकाल जाहीर होताच वकील बांधवांनी जल्लोष करत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्ष (पुरुष) म्हणून ॲड. गणेश कळसकर, उपाध्यक्ष (महिला) म्हणून ॲड. कीर्ती श्रीकांत, सचिवपदी ॲड. अक्षय पाचरणे आणि खजिनदारपदी ॲड. धनंजय गायकवाड यांची निवड झाली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून ॲड. गणेश सटाळे, ॲड. गणेश चौगुले, ॲड. भारत खाडे, ॲड. तेजल गायकवाड आणि ॲड. शुभांगी गवळी यांनी विजय मिळविला.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी ॲड. भागवत दिघे, ॲड. सीमा काशीकर, ॲड. अब्दुलवहाब पटेल, ॲड. सुहास लोखंडे आणि ॲड. अतुल खेडकर यांनी पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडली.
नवनिर्वाचित कार्यकारिणीचे न्यायालयीन परिसरात व विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, बार असोसिएशनच्या कामकाजाला अधिक गतिमान, पारदर्शक आणि सदस्याभिमुख दिशा मिळेल, अशी अपेक्षा वकील बांधवांनी व्यक्त केली.
सामाजिक क्षेत्रातही सक्रिय व्यक्तिमत्त्व
मुळचे कोरेगाव भीमा येथील असलेले ॲड. विकास फडतरे हे वकिली व्यवसायाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही सक्रिय आहेत. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असून तरुण वकील आणि सर्वसामान्य नागरिकांशी त्यांचा सातत्याने संपर्क राहिला आहे. त्यांचे वडील बाळासाहेब फडतरे हे कोरेगाव भीमा येथील सुप्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक असून त्यांनी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळली आहे.
पारदर्शक, लोकाभिमुख कामकाज करु…
“घोडनदी बार असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. हा विजय केवळ माझा नसून संपूर्ण वकील बांधवांचा आहे. बारमधील सर्व सदस्यांना एकत्र घेऊन न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक सुविधा वाढविणे, तरुण वकिलांना मार्गदर्शन व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, बारची पायाभूत सुविधा बळकट करणे आणि सदस्यांच्या हिताचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू. सर्वांना विश्वासात घेऊन पारदर्शक, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कामकाज करण्याचा माझा निर्धार आहे.”
ॲड. विकास फडतरे, नवनिर्वाचित अध्यक्ष.



