नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ॲडव्हान्टेज विदर्भ’ परिषदेत जागतिक सहभागातून ४२,००० कोटींच्या गुंतवणुकीची नोंद
ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम (GIBF)च्या सहकार्यानें परिषदेचे आयोजन

नागपुर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपुर येथे पार पडलेल्या ‘ॲडव्हान्टेज विदर्भ २०२६’ आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषदेमुळे प्रदेशाच्या औद्योगिक क्षमतेला नवे बळ मिळाले, तर २३ देशांतील राजनैतिक प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या या परिषदेत ४२,००० कोटी गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांची नोंद झाली.

ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम (GIBF)च्या सहकार्यानें या परिषदेचे आयोजन केल्याचे संस्थापक डॉ.जितेंद्र जोशी यांनी सांगितले. यावेळी बोलताना गडकरी यांनी नमूद केले की, ‘अशा आंतरराष्ट्रीय परिषदांमुळे प्रदेशातील उद्योगांना निर्यातवाढीसाठी संधी उपलब्ध होतात आणि स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळतो.’ त्यांनी या परिषदेला विदर्भाच्या आर्थिक विकासातील महत्त्वाचा टप्पा, असेही संबोधले.
तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याच्या गुंतवणूक धोरणांचा उल्लेख करताना सांगितले की, ‘विदर्भ सध्या सर्वाधिक आशादायक गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येत असून राज्य शासनाने उद्योगसुलभ वातावरण निर्माण करण्यासाठी पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स आणि सुलभ परवानगी प्रक्रियेवर भर दिला आहे.
परिषदे दरम्यान ४२,००० कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांची नोंद झाली, तसेच उत्पादन, औद्योगिक पार्क, ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि निर्यात क्षेत्रातील गुंतवणूक प्रस्तावांवरही चर्चा झाली. परिषदेत देशनिहाय व क्षेत्रनिहाय चर्चासत्रांचेही आयोजन करण्यात आले.
यावेळी संस्थापक डॉ. जितेंद्र जोशी यांनी ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमच्या (GIBF) जागतिक नेटवर्कची माहिती दिली. सचिव जनरल दीपली गडकरी आणि संचालक अभिषेक जोशी यांनी आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसोबत संरचित संवाद सत्रांचे नेतृत्व केले.



