लोणीकंद ग्रामंपचायतीच्या वतीने दोन कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन

विविध विकासकामांमुळे गावातील पायाभूत सुविधांमध्ये भरीव वाढ तसेच नागरिकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध : प्रदीपदादा कंद

पुणे : लोणीकंद, (ता. हवेली) : येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मंजूर झालेल्या दोन कोटी पाच लाख रुपयांहून अधिक निधीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. 

       भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीपदादा कंद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती हवेलीचे माजी उपसभापती नारायणराव कंद, जिल्हा परिषद सदस्य पै.किरण साकोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रवींद्र कंद, पंचायत समिती सदस्या मोनिका कंद, सरपंच सुप्रिया कंद, उपसरपंच सागर कंद तसेच गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमात सुमारे ९६ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले, तर अंदाजे एक कोटी नऊ लाख रुपयांच्या पूर्ण झालेल्या विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. या विकासकामांमुळे गावातील पायाभूत सुविधांमध्ये भरीव वाढ होऊन नागरिकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रदीपदादा कंद यांनी सांगितले.

        लोणीकंदच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या या विविध विकास कामांसाठी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराचे कौतुक करत या विकासकामांमुळे गावाच्या प्रगतीला नवी गती मिळेल, असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य पै.किरण साकोरे व बाजार समितीचे माजी उपसभापती रवींद्र कंद यांनी व्यक्त केला.

तर नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून भविष्यातही विकासकामांचा वेग कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी पंचायत समिती सदस्या मोनिका कंद, सरपंच सुप्रिया कंद, उपसरपंच सागर कंद आदींनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी जालिंदर बोरावणे यांनी केले, तर सरपंच सुप्रियाताई कंद यांनी आभार मानले. यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य, आजी-माजी पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button