राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राची विजयी घोडदौड कायम; यजमान मध्य प्रदेशवर १-० ने मात

दीव-दमणनंतर मध्य प्रदेशलाही नमविले; १४ वर्षांखालील मुलांच्या संघाची पुढील फेरीत धडक

छतरपूर : मध्य प्रदेशातील छतरपूर येथे सुरू असलेल्या ७० व्या एसजीएफआय (SGFI) राष्ट्रीय १४ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने यजमान मध्य प्रदेशच्या संघाचा १-० असा पराभव करीत पुढील फेरीत प्रवेश केला.

छतरपूर येथील मैदानावर झालेल्या या सामन्यात मध्य प्रदेशच्या संघाने घरच्या मैदानाचा फायदा घेत महाराष्ट्रासमोर कडवे आव्हान उभे केले. मात्र, महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट पासिंग, अचूक समन्वय आणि आक्रमक खेळाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना रोखून धरले. सामन्याच्या उत्तरार्धात निर्णायक गोल नोंदवत महाराष्ट्राने विजयावर शिक्कामोर्तब केले.

स्पर्धेतील महाराष्ट्राचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने दीव-दमण संघाचा ७-० अशा मोठ्या फरकाने पराभव केला होता. त्यानंतर यजमान मध्य प्रदेशला नमविल्याने महाराष्ट्राच्या संघाचा आत्मविश्वास वाढला असून, स्पर्धेतील विजेतेपदाच्या दिशेने संघाची वाटचाल सुरू आहे.

या संघाला राष्ट्रीय प्रशिक्षक तानाजी पाटील आणि संघ व्यवस्थापक विनोद झाडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. खेळाडूंची मेहनत, संघातील समन्वय आणि प्रशिक्षकांचे नियोजन यामुळे महाराष्ट्राला हे यश मिळत असल्याचे क्रीडाप्रेमींनी म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या या कामगिरीबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, सहायक जिल्हा क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकते, शिबिरप्रमुख तथा तालुका क्रीडा अधिकारी संतोष लवटे, क्रीडा प्रबोधिनीचे राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक धीरज मिश्रा, राज्य क्रीडा मार्गदर्शक उज्वला माने आणि नाना तळवदे यांनी खेळाडू व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. तसेच आगामी सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button