फुलगावच्या ऐतिहासिक कमानी घाटावर दीपोत्सवाचा लखलखाट; असंख्य दिव्यांनी उजळला पेशवेकालीन वारसा !

जिल्हा परिषद सदस्य पै. किरणशेठ साकोरे यांच्यासह तरुणाई व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग; ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनाचा आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचा अनोखा संदेश

पुणे : दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि निराशेवर आशेचा विजय! याच मंगलमय भावनेतून फुलगाव (ता. हवेली) येथील ग्रामस्थांनी एकत्र येत भीमा नदीच्या काठावरील ऐतिहासिक पेशवेकालीन कमानी घाटावर दीपोत्सव सोहळा उत्साहात साजरा केला. असंख्य पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघालेला घाट, आकर्षक रोषणाई आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते.

समस्त ग्रामस्थ फुलगाव आणि कमानी घाट संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील तरुणाईने पुढाकार घेत ग्रामस्थांच्या सहकार्याने ऐतिहासिक घाट परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर घाटाच्या पायऱ्या, कमानी आणि परिसरात आकर्षक पद्धतीने दिव्यांची मांडणी करण्यात आली. सायंकाळच्या वेळी एकाच वेळी प्रज्वलित केलेल्या असंख्य दिव्यांनी संपूर्ण घाट उजळून निघाला. ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्य आणि दीपप्रकाशाची मनमोहक आरास यामुळे उपस्थितांना अविस्मरणीय अनुभव मिळाला.

पेशवेकालीन स्थापत्यकलेचा ऐतिहासिक ठेवा

फुलगाव येथील कमानी घाट हा भीमा नदीच्या काठावर वसलेला ऐतिहासिक वास्तुशिल्पाचा महत्त्वपूर्ण ठेवा आहे. मराठा-पेशवेकालीन स्थापत्यशैलीचे वैशिष्ट्य दर्शविणाऱ्या या घाटाचे बांधकाम घडीव दगडांमध्ये करण्यात आले आहे. भव्य प्रवेशरचना, दगडी कमानी, नदीपात्राकडे जाणाऱ्या पायऱ्या आणि घाटाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या लहान दगडी खोल्या ही या वास्तूची वैशिष्ट्ये आहेत. उपलब्ध वारसा नोंदींनुसार हा घाट अठराव्या शतकातील मराठा कालखंडाशी संबंधित मानला जातो. स्थानिक माहितीनुसार दुसरे बाजीराव पेशवे यांच्या काळात फुलगाव परिसराचा विशेष विकास झाला होता. त्यावेळी गावाला बाजारपेठेचे महत्त्वही प्राप्त झाले होते. 

नदीवर पाणी भरणे, स्नान करणे तसेच जनावरांना पाणी पिण्यासाठी सोयीचे व्हावे, या उद्देशाने पूर्वी अशा घाटांची निर्मिती केली जात असे. कमानी घाटाची भव्य रचना तत्कालीन जलव्यवस्थापन, स्थापत्यकला आणि लोकजीवनाची साक्ष देणारी आहे. आजही या वास्तूतून पेशवेकालीन वैभवाच्या पाऊलखुणा अनुभवायला मिळतात. मात्र, अशा ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करण्याची गरज आहे.

दीपोत्सवातून ऐतिहासिक वारसा जपण्याचा संकल्प

दिवाळीतील दीपोत्सवाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. प्रत्येक दिवा हा आशा, मांगल्य, सकारात्मकता आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. केवळ घराघरांत दिवे लावण्यापुरता हा उत्सव मर्यादित न ठेवता ऐतिहासिक वास्तू, मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणी सामूहिकरीत्या दीपप्रज्वलन करणे, यातून सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक वारशाविषयीची जाणीव अधिक दृढ होते. फुलगाव ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या या उपक्रमातून याच भावनेचे दर्शन घडले.

या सोहळ्यात सहभागी होत जिल्हा परिषद सदस्य पै. किरणशेठ साकोरे यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने ऐतिहासिक वास्तूची स्वच्छता आणि दीपोत्सवाचे कौतुक केले. तसेच या उपक्रमामुळे नव्या पिढीला गावाच्या ऐतिहासिक वारशाची ओळख होण्याबरोबरच त्याच्या जतन आणि संवर्धनाची प्रेरणाही मिळाली. ऐतिहासिक वास्तूंच्या दर्शनासोबतच त्यांच्याशी भावनिक नाते जोडून त्यांचे जतन करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे आवाहन यावेळी जिल्हा परिषद सदस्य पै. किरणशेठ साकोरे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button