नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या प्रांगणात रंगला राज्यस्तरीय कबड्डीचा थरार
कबड्डी स्पर्धेत ३१ जिल्ह्यातून ६०० खेळाडूंचा सहभाग
पुणे : फुलगाव (ता. हवेली) येथे नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या प्रांगणात पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या स्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत ३१ जिल्ह्यातून आलेल्या सुमारे ६०० खेळाडूंमध्ये फुलगावात रंगला . कब्बडीचा थरार रंगला.
सैनिकी शाळेच्या मैदानावर २४ ते २८ जानेवारी दरम्यान झालेल्या स्पर्धेत किशोरी गटातून जालना संघानं प्रथम क्रमांक पटकावत आपलं महिला कबड्डीमधील वर्चस्व सिद्ध केलं. तर, दुसरीकडे पिंपरी-चिंचवडच्या संघानं मुलांच्या गटातून प्रथम क्रमांक मिळवला. महिलांमध्ये नाशिक ग्रामीणच्या संघानी द्वितीय क्रमांक, ठाणे ग्रामीण व परभणीच्या संघाने तृतिय क्रमांक पटकावला. तर, किशोर गटात नंदुरबारच्या मुलांच्या संघानं द्वितीय क्रमांक आणि पुणे ग्रामीण आणि बीडच्या मुलांच्या संघानं तिसरा क्रमांक पटकावला.
श्रीमती गिरीजा बापट यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण
या स्पर्धेत रविवारी (ता. २८) स्पर्धेचे उपांत्य व अंतिम सामने झाल्यानंतर दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या पत्नी गिरीजा बापट यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी शिरुर-हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार, ह.भ.प कबीर महाराज, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सचिव बाबूराव चांदेरे, राष्ट्रपती पदक विजेत्या खेळाडू शकुंतला पाटील, माजी कबड्डीपटू वासंती सातव, छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू माणिकराव बोघाडे, लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे, वंदे मातरम संघटनेचे संस्थापक वैभव वाघ, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे दत्ता झिंझुर्डे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कबड्डी स्पर्धेत सहभागी खेळाडूंचं कौतुक करताना खेळाला सातत्याने प्राधान्य देणारे या स्पर्धेचे आयोजक लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार दीपक पायगुडे यांचंही कौतुक केलं.
विद्यार्थ्यांनी रेखाटलेली व्यक्तीचित्रे मान्यवरांना भेट
या स्पर्धेवेळी नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवर, तसेच महाराष्ट्र व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंच, सामनाधिकारी यांची हुबेहुब चित्रे रेखाटत संबंधित व्यक्तींना ती भेट दिली.
स्पर्धेसाठी मोठ्या संख्येनं उपस्थिती
स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील विविध संघांचे खेळाडू, प्रशिक्षक, महाराष्ट्र व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.