राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतून ऑलिंम्पिक दर्जाचे मल्ल घडतील – आयोजक ज्ञानेश्वर कटके आणि सुरेंद्र पठारे यांचा विश्वास
राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धांना खराडीत सुरुवात
पुणे : खाशाबा जाधव यांनी मॅट वरच कुस्ती खेळून साकारलेल्या ऑलिंम्पिक विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी आगामी काळात जागतिक दर्जाचे मल्ले महाराष्ट्राच्या मातीतून घडावेत, या उद्देशाने महाराष्ट्रात तब्बल २३ वर्षांनंतर आणि पुण्यात प्रथमच होणाऱ्या वरिष्ठ (सिनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतून ऑलिंम्पिक दर्जाचे मल्ल घडतील, असा विश्वास आयोजक जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके आणि भाजपचे युवा नेते सुरेंद्र पठारे यांनी व्यक्त केला.
भारतीय कुस्ती महासंघाच्या मान्यतेने व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने वरीष्ठ (सिनियर) राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेस आजपासुन खराडी, पुणे येथे उत्साहात सुरुवात झाली. या कुस्ती स्पर्धा तीन दिवस चालणार आहेत.
२३ वर्षानंतर महाराष्ट्रात स्पर्धेचे आयोजन
यापूर्वी सन २००० मध्ये अमरावती येथे झालेल्या या स्पर्धेनंतर सुमारे २३ वर्षानंतर महाराष्ट्रात खराडी (पुणे) येथे होत असलेल्या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रीय कुस्तीगीर पै.ज्ञानेश्वर कटके तसेच युवा नेते सुरेंद्र बापुसाहेब पठारे यांनी घेतली असून खेळाडुंची निवास व भोजनाची उत्तम व्यवस्थापनासह त्यांनी स्पर्धेचे उत्तम नियोजन केले असल्याचे महाराष्ट्र प्रदेश क्रिडा आघाडीचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी सांगितले.
२५ राज्यातून ७५० कुस्तीगीरांचा स्पर्धेत सहभाग
ही स्पर्धा पुरुष फ्रीस्टाईल (१० वजनगट), पुरुष ग्रिकोरोमन (१० वजनगट) व महीला (१० वजनगट) अशा ३ विभागात होत असुन २५ राज्यांचे ७५० कुस्तीगीर या स्पर्धेत सहभागी होत आहे. भारतातील अनेक नामवंत व आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त कुस्तीगीरही या स्पर्धेत सहभागी होत असल्याने ही स्पर्धा अतिशय रंगतदार व चुरशीची होणार आहे. तसेच महाराष्ट्रातील कुस्तीगीरांसाठी ही स्पर्धा अतिशय महत्वाची असुन अशा प्रकारच्या स्पर्धेतुन महाराष्ट्रातील कुस्तीगीरांना स्फुर्ती मिळणार असल्याचे संदीप भोंडवे यांनी सांगितले.
ऑलिंम्पिक दर्जाचे खेळाडून घडावेत – कटके
खराडी येथील कै. विठोबा मारूती पठारे क्रीडा संकुलात होणाऱ्या या कुस्ती स्पर्धा विषयी अधिक माहिती देताना ज्ञानेश्वर (आबा) कटके म्हणाले की, या स्पर्धेतून ऑलिंम्पिक दर्जाचे, सक्षम मल्ला तयार व्हावेत, या उद्देशातून मल्लांना हक्काचे मैदान मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मातीत कुस्ती खेळणाऱ्या मल्लांना मॅटवरची कुस्ती आत्मसात करायला नेहमीच जिकीरीचं गेले आहे. पण, अलिकडे महाराष्ट्राच्या अनेक मल्लांनी मॅट वरील कुस्ती आपलीशी मानुन महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार नेला आहे. परंतु, अद्यापही संधी अभावी अनेक मल्ल तांबड्या मातीत अडकून आहेत. अनेक कुस्तीप्रेमींना मॅट वरील कुस्तीच्या लढती पाहायलाही मिळत नाहीत.आंतराष्ट्रीय नियमांनुसार चालणारी आधुनिक कुस्तीच्या लढतीची पद्धत बहुतांशी वेळा लक्षात येत नाही, याच कारणामुळे मॅट वरील कुस्तीच अचुक विश्लेषण समजावे, अशा शब्दांत तसेच दृश्य स्वरुपात आपल्या येथील मल्लांनाही ते कळावे, यातून ऑलिंम्पिकच्या दर्जाचे खेळाडून घडवण्याच्या उद्देशाने खराडीमध्येया स्पर्धेचे आयोजन केले असून या स्पर्धेचा लाभ राज्यभरातील व प्राधान्याने जिल्ह्यातील मल्लांना होणार असल्याने अधिकाधिक मल्ल व कुस्ती शाैकिनांनीही या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन ज्ञानेश्वर कटके यांनी केले.