पुण्याच्या अर्जुन हरगुडेची भारतीय कनिष्ठ हॉकी संघात निवड

बेल्जियम दौऱ्यात अर्जुनच्या निवडीमुळे केसनंद व पुणे जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण

पुणे : आगामी बेल्जियम दौऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या भारताच्या २० वर्षांखालील (कनिष्ठ) पुरुष हॉकी संघात पुण्याच्या हवेली तालुक्यातील केसनंद गावचा रहिवासी असलेला उदयोन्मुख हॉकीपटू अर्जुन संतोष हरगुडे याची भारतीय कनिष्ठ हॉकी संघात निवड झाल्याने केसनंद गावासह पुणे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे.

‘हॉकी इंडिया’ने ५ ते १८ जुलै २०२६ या कालावधीत होणाऱ्या बेल्जियम दौऱ्यासाठी २२ सदस्यीय भारतीय कनिष्ठ संघाची घोषणा केली आहे. मुख्य प्रशिक्षक फ्रेडरिक सोयेझ यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय कनिष्ठ संघाचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा असणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी, खेळाप्रती असलेली निष्ठा आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर अर्जुनने भारतीय संघात मानाचे स्थान मिळवले आहे.

केसनंद गावात आनंदाचे वातावरण….

हवेली तालुक्यातील केसनंद गावच्या अर्जुन हरगुडेच्या निवडीमुळे पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अर्जुनला लहान पणापासूनच त्याचे वडील तथा केसनंदचे माजी उपसरपंच संतोष हरगुडे यांच्यासह संपूर्ण कुटुंबाचे मोलाचे पाठबळ लाभले. त्याच्या या यशामुळे हरगुडे कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, संपूर्ण गावासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.

अर्जुन फुलगावच्या सैनिकी शाळेचा विद्यार्थी…

अर्जुन हरगुडे हा माजी आमदार दिपक पायगुडे यांच्या फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचालित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी स्कूलचा विद्यार्थी असून याच शाळेत त्याची खेळाची सुरुवात झाली. आज तो राष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करत आहे, याचा सार्थ अभिमान व आनंद असून एक दिवस तो भारताच्या संघाचे नेतृत्व करेल, असा विश्वास संस्था प्रमुख दीपक पायगुडे यांनी व्यक्त केला.

‘प्रसिद्ध ऑलिम्पिकपटू धनराज पिल्ले व विक्रम पिल्ले यांच्यानंतर भारतीय संघात थेट प्रतिनिधित्व करणारा अर्जुन हा या राज्यातील तिसरा खेळाडू ठरला आहे.

प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन…

आजवर त्याला ‘हॉकी महाराष्ट्र’चे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज भोरे तसेच ऑलिम्पिकपटू विक्रम पिल्ले यांच्यासह प्रशिक्षक अनिकेत मोरे, सागरसिंग ठाकूर यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे त्याचे वडील संतोष हरगुडे यांनी सांगितले.

……..

क्रीडाप्रेमींना अर्जुनकडून मोठ्या अपेक्षा…

बेल्जियम दौऱ्यात भारतीय कनिष्ठ संघाचा युरोपातील बलाढ्य संघांविरुद्ध सराव सामने होणार असून, त्यामुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील मौल्यवान अनुभव मिळणार आहे.    या दौऱ्यातील कामगिरीच्या जोरावर अर्जुन हरगुडे भारतीय कनिष्ठ संघात आपले स्थान अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न करणार असून, त्याच्याकडून महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या क्रीडाप्रेमींना मोठ्या अपेक्षा आहेत.

……….

केसनंद गावच्या वतीने होणार सत्कार….

अत्यंत परिश्रमाने व आपल्या क्रीडा कौशल्याने अर्जुनने हे यश मिळवल्याने केसनंद गावासह पुणे जिल्हा व राज्यसह देशाचाही अभिमान उंचावला आहे. त्याच्या या प्रेरणादायी यशाचा आम्हा सर्वांनाच सार्थ अभिमान आहे. तो परत आल्यावर त्याचा गावच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.

मिलिंद हरगुडे, माजी सरपंच, केसनंद.

…………

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button