केसनंद चौकात वाहतूक नियंत्रणासाठी जनसेवक संपतआबा गाडे यांनी बसवलेले भोंगे परिणामकारक; तर अंडरपास व उड्डाण पूलासारख्या कायमस्वरुपी उपाययोजनांसाठी आमदार माऊली कटके यांचा पुढाकार….
निधीसह ठोस कार्यवाहीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार : आमदार ज्ञानेश्वर कटके

पुणे : पुणे शहराच्या पूर्व भागातील वेगाने विकसित होणाऱ्या वाघोली, लोणीकंद, केसनंद, आव्हाळवाडी आणि वाघेश्वर परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. विशेषतः केसनंद चौकात लोणीकंद-थेऊर तसेच वाघोली-राहू मार्गावरील वाहनांची मोठी वर्दळ असल्याने गर्दीच्या वेळी येथे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. या पार्श्वभूमीवर जनसेवक संपतआबा गाडे यांच्या पुढाकारातून केसनंद चौकात बसविण्यात आलेले भोंगे (लाऊडस्पीकर) वाहतूक नियंत्रणासाठी परिणामकारक ठरत असून, नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.
मात्र, केसनंद चौकातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अंडरपास किंवा उड्डाणपूल उभारण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर आली आहे. आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊलीआबा कटके यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (एमएसआयडीसी) याबाबतचा प्रस्ताव तयार केला असुन निधीसह पुढील कार्यवाहीसाठी शासनस्तरावर आमदार ज्ञानेश्वर कटके यांचा पाठपुरावाही सुरु आहे. मात्र हा प्रश्न कधी मार्गी लागणार ? याची नागरीकांना उत्कंठा आहे.
भोंग्यांद्वारे वाहतूक नियंत्रणाचा प्रयत्न
केसनंद चौकातील वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका लक्षात घेऊन जनसेवक संपतआबा गाडे यांनी स्वखर्चातून पुढाकार घेत वाहतूक नियंत्रणासाठी भोंगे बसविले आहेत. या माध्यमातून वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आणि शिस्तबद्ध पद्धतीने वाहन चालविण्याचे आवाहनही केले जात आहे. याशिवाय, परिसरातील वाहतूक व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्यासाठी संपतआबा गाडे यांनी पुणे शहराचे अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांची भेट घेऊन विविध उपाययोजनांबाबत चर्चा केली. यावेळी वाहतूक समस्येकडे लक्ष घालण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
अंडरपास की उड्डाणपूल? प्रस्ताव तयार
केसनंद चौकातील वाहतूक कोंडीचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्यासाठी वाघोली-राहू राज्य मार्ग क्रमांक ६८ वर अंडरपास अथवा उड्डाणपूल उभारण्याचा पर्याय पुढे आला आहे. आमदार माऊली कटके यांच्या मागणीनुसार एमएसआयडीसीने यासंदर्भातील प्रस्ताव तयार केला आहे. मात्र, या कामासाठी आवश्यक निधीसह पुढील कार्यवाही होणे महत्त्वाचे आहे.यासाठी आवश्यक कार्यवाही करून सहकार्य करण्याची विनंती एमएसआयडीसीने पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरणाला केली आहे.
अतिक्रमणे हटविणार, विद्युत खांबांचे स्थलांतर
अंडरपास किंवा उड्डाणपुलाच्या दीर्घकालीन उपाययोजनेसह वाहतुकीला तातडीने दिलासा देण्यासाठी केसनंद चौकातील अतिक्रमणे हटविणे आणि वाहतुकीला अडथळा ठरणारे विद्युत खांब स्थलांतरित करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. केसनंद चौकातील वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थी, कामगार, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भोंग्यांच्या माध्यमातून सुरू झालेला वाहतूक नियंत्रणाचा प्रयत्न आणि प्रस्तावित अंडरपास अथवा उड्डाणपुलाचे काम प्रत्यक्षात कधी सुरू होणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
प्रशासनासोबत समन्वयातून वाहतूक कोंडीमुक्तीचा प्रयत्न : संपतआबा गाडे
पुणे शहराच्या पूर्व भागातील वाघोली, लोणीकंद, केसनंद, आव्हाळवाडी आणि वाघेश्वर परिसरात वाढत्या वाहतूक कोंडीवर सामुहिक प्रयत्न गरजेचे आहे. नागरिकांना दिलासा देण्यासाठी केसनंद येथे वाहतूक नियंत्रणासाठी भोंगे बसविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मात्र गर्दीच्या वेळेत पोलिस बळ वाढविणे, विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर कारवाई, बेशिस्त पार्किंगला प्रतिबंध आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागातून रहदारी नियंत्रण पथक स्थापन करणे तसेच प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयातून वाहतूक कोंडी मुक्त परिसर निर्माण करण्यांसाठी सर्वाचेच सहकार्य गरजेचे आहे.
— संपतआबा गाडे, जनसेवक
निधीसह ठोस कार्यवाहीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार : आमदार ज्ञानेश्वर कटके
केसनंद चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने या ठिकाणी अंडरपास किंवा उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला, ही सकारात्मक बाब आहे. निधीअभावी कामाला विलंब होऊ नये, यासाठी शासनस्तरावर आवश्यक तो पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच विद्युत खांबांचे स्थलांतर यासारख्या तातडीच्या उपाययोजना करून वाहतूक सुरळीत करण्यास प्राधान्य दिले जाईल.
— ज्ञानेश्वर उर्फ माऊलीआबा कटके, आमदार, शिरूर-हवेली.
————————————-



