भीमा नदीपात्रात आढळलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याचे शिक्रापूर पोलिसांचे आवाहन

३० ते ३५ वर्षांच्या पुरुषाचा सांगाडा आढळला; ओळख पटविण्यासाठी RAIDS ॲपच्या साहाय्याने तयार केली अंदाजित छायाचित्रे

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा येथील भीमा नदी पात्रात ऑगस्ट महिन्यात आढळून आलेल्या अनोळखी पुरुषाच्या मृतदेहाची अद्यापही ओळख पटलेली नाही. या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशन तसेच पुणे ग्रामीण पोलिसांनी अंदाजित छायाचित्रांसह माहिती प्रसिद्ध केली असून, त्याबाबत काही माहिती असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास टाकळी भीमा (ता. शिरूर, जि. पुणे) येथील भीमा नदीच्या पात्रात हा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अंगावरील कपड्यांवरून ओळख पटविण्याचे आवाहन

   मृत व्यक्तीच्या अंगावर लाल रंगाचा हाफ बाह्यांचा टी-शर्ट, काळ्या रंगाची जिन्स पँट तसेच काळ्या रंगाचे शूज तसेच काळ्या रंगाचे बनियान असून, त्याच्या पुढील बाजूस ‘INDIAN ARMY’ तसेच कॉलरवर ‘Shakti Winning Spirit’ असे इंग्रजी शब्द लिहिलेले असल्याचे  पोलिसांनी नमूद केले आहे.

RAIDS ॲपच्या साहाय्याने चेहऱ्याची अंदाजित छायाचित्रे

   मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी RAIDS या तांत्रिक प्रणालीच्या साहाय्याने मृतदेहाच्या उपलब्ध माहितीवरून चेहऱ्याची अंदाजित छायाचित्रे तयार केली आहेत. या छायाचित्रांच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या छायाचित्रांतील व्यक्तीशी साधर्म्य असलेली व्यक्ती आपल्या परिचयातील असल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय

   या अनोळखी मृत व्यक्तीबाबत कोणाकडेही माहिती असल्यास नागरिकांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन : ७०७४१००११२, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव : ९९२३६३०६५२, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख : ९५५२९९८९२० तसेच पोलीस हवालदार गणेश कुडळे : ९८२२२९२१३१ यांच्याशी संपर्क साधावा,  असे आवाहन शिक्रापूर पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असून, माहिती देणाऱ्यास बक्षीसही देण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

………

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button