कायदा मोडणाऱ्यांची गय करणार नाही – पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव

कोरेगाव भीमा येथे ग्रामस्थ व पोलिसांची संयुक्त बैठक; गुन्हेगारी, औद्योगिक वाद आणि वाहतूक कोंडीवर चर्चा

पुणे : गुन्हेगारीची किड समूळ नष्ट करण्यासाठी गावागावात ग्रामस्थ आणि पोलिस यंत्रणेने एकजुटीने सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. गावातील शांतता, सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था टिकविण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागावे, असे आवाहन करतानाच कायदा मोडणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय करणार नाही, असा सणसणीत इशारा शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला.

कोरेगाव भीमा येथे ग्रामस्थ आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील वाढते औद्योगिकीकरण, उद्योग-व्यवसायांमुळे निर्माण होणारे वादविवाद, गुन्हेगारीला प्रतिबंध तसेच अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक कोंडी आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य पि.के (आण्णा) गव्हाणे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संचालक नारायणराव फडतरे, फ्रेन्डस एज्युकेशन इंस्टीट्युटचे अध्यक्ष व माजी उपसरपंच राजाराम ढेरंगे, अशोक काका गव्हाणे, माजी सरपंच अनिकेत गव्हाणे, विजयराव गव्हाणे, अशोक काशीद, केशवराव फडतरे, दत्तात्रय ढेरंगे, कांतीलाल फडतरे, नारायण ढेरंगे, बबनराव गव्हाणे, पंडित ढेरंगे, शिवाजीराव ढेरंगे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शिरूर-हवेली प्रासादिक दिंडीचे सचिव विवेक ढेरंगे यांनी स्वागत करताना कोरेगाव भीमा येथील औद्योगिक आणि सामाजिक परिस्थितीचा आढावा मांडला. कोरेगाव भीमा परिसराला चांगली आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. मात्र, बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे गावातील सामाजिक वातावरणात बदल होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. परिसरात आलेल्या सुमारे ४० ते ५० कंपन्यासोबतच गोडावूनसाठी जमिनी भाड्याने देण्याचा व्यवसायही वाढत असून, या उद्योग-व्यवसायांमुळे काही ठिकाणी वादविवादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने एकजुटीने या समस्यांवर मार्ग काढण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले की, कोरेगाव भीमा परिसर हा सधन आणि रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध असलेला भाग आहे. मात्र, उद्योग-व्यवसाय करताना परस्परांमध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे. कायद्याचे पालन करणाऱ्यांना पोलिस यंत्रणेचे नेहमीच सहकार्य राहील; मात्र कायदा मोडणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही. सामान्य नागरिकांच्या तक्रारींचीही गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई केली जाईल. गावातील चांगल्या वातावरणाला बाधा आणणाऱ्या चुकीच्या प्रवृत्तींना कोणताही दिलासा दिला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच गोदाम व्यवसाय सुरू करताना चांगल्या कंपन्या आणि विश्वासार्ह व्यक्तींची निवड करावी. कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता आपले चारित्र्य आणि सामाजिक प्रतिष्ठा जपावी. गुन्हेगारीपासून दूर राहावे. कोणतीही अडचण निर्माण झाल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

पुढे बोलताना ते म्हणाले, वादविवाद पुन्हा उद्भवू नयेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. कोणत्याही गुन्हेगाराचा आणि गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीचा शेवट कधीच चांगला होत नाही. राज्यात सध्या लागू असलेल्या महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) आणि एमपीडीए यांसारख्या कठोर कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे गुन्हेगारीवर वचक निर्माण झाला आहे. लोकशाहीत मतभेद असणे स्वाभाविक आहे; मात्र मनभेद होऊ देऊ नयेत. गाव हे एका कुटुंबाप्रमाणेच असून, गावपण टिकविण्यासाठी संवाद, सामंजस्य आणि परस्परांना समजून घेण्याची भूमिका आवश्यक आहे. प्रसंगी परस्परांना माफ करावे आणि गरज असल्यास माफीही मागावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी कामगार नेते अविनाश देवकर यांनी औद्योगिक क्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. काही ठिकाणी एचआर विभाग आणि कंत्राटदार यांच्या संगनमतामुळे कामगारांच्या वेतनात कपात केली जात असून, कंत्राटी कामगारांवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, अहिल्यानगर महामार्गावरील कोरेगाव भीमा येथे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गर्दीच्या वेळी वढू चौक वाहतुकीसाठी बंद ठेवण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. यावेळी सहाय्यक पोलिस अधिकारी भोसले यांनी वाहतूक कोंडीचे संकट दूर करण्यासाठी प्रभावी वाहतूक नियोजनासोबतच ग्रामस्थांचे सहकार्यही महत्त्वाचे असल्याचे सांगितले. माजी सरपंच विजय गव्हाणे पाटील यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button