अजितदादांमुळे अनेक अधिकारी व पदाधिकारी घडले, ते स्वतःच एक व्यवस्थापन विद्यालय होते – उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी

कोरेगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचा वाढदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरात ५५२५ प्रकरणांचे निराकरण

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत शिरूर (घोडनदी) तहसील कार्यालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरात नागरिकांनी महसूल सह विविध विभागात दाखल केलेली ५५२५ अर्ज प्रकरणे निकाली काढून लाभार्थ्यांना विविध महसुली सेवांचा लाभ देण्यात आला.

     कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शिरूर-हवेलीचे आमदार माऊली कटके यांच्या पुढाकाराने आयोजित या विशेष शिबिरामध्ये शिरूर मतदारसंघातील नागरिकांच्या महसूल तसेच विविध विभागांशी संबंधित विविध समस्या, अर्ज, दाखले, प्रकरणे व शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन तसेच आवश्यक सेवा एकाच ठिकाणी स्टॉल्सद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

     या शिबिरास उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक, तसेच पंचायत समिती उपसभापती रामभाऊ सासवडे, जिल्हा परिषद सदस्या मोनिका हरगुडे, प्रफुल्ल शिवले, विजय रणसिंग, पंचायत समिती सदस्या कोमल ढेरंगे, कोरेगाव भीमाचे सरपंच अनिकेत गव्हाणे, उपसरपंच सविता बजरंग घावटे, सणसवाडीच्या सरपंच शशिकला सातपुते, उपसरपंच मोहन हरगुडे यांच्यासह अनेक मान्यवर तसेच मंडल अधिकारी गुलफाम शेख यांच्यासह सर्व मंडल अधिकारी, ग्राममहसुल तसेंच ग्रामपंचायत अधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

     यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात सुरू असलेल्या समाधान शिबीरांमुळे शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरीकांना मिळते. तसेच विविध विभागांच्या सेवाही एकाच छताखाली नागरिकांना मिळतात. यात आलेल्या नागरीकांच्या प्रत्येक अर्जांचे निराकरण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असतो. शासनाच्या नव्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतकामासाठी काढाव्या लागणाऱ्या गौण खनिजाला यापुढे रॉयल्टी लागणार नाही. बळीराजा पाणंद रस्ते ही शेतकरी बांधवांसाठी अतिशय फायदेशीर असलेली क्रांतिकारी योजना असून यात रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी शासकीय निधीही दिला जातो. या योजनेनुसार येत्या काळात शिरूरमध्ये १२५ रस्ते मजबुतीकरणासाठी शासनाचा प्रयत्न आहे. यात लोकप्रतिनिधिचाही मोठा पुढाकार आहे. 

     तर अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना, विकास कामे करणे तसेच प्रशासन चालवण्याच्या दृष्टीने अजितदादा हे स्वतःच एक मॅनेजमेट स्कुल होते. अनेक अधिकारी व पदाधिकारी हे अजितदादामुळेच घडले, असे सांगताना अजितदादामुळे पुणे जिल्ह्यातल्या महसूल अधिकाऱ्यांना न मागताच नवी वाहने मिळाल्याचेही विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

      तर उपसभापती रामभाऊ सासवडे यांनी पंचायत समितीच्या वतीने करण्यात आलेल्या कामांची तसेच राबवलेल्या योजनांची माहिती देत तहसिल व पंचायत समिती प्रशासनाचे कौतुक केले. तर जिल्हा परिषद सदस्या मोनिका हरगुडे यांनी स्व.अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी धडाडीने केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला.

      प्रास्ताविकात तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी शिबीराचा उद्देश स्पष्ट करून शासनाच्या विविध योजनांची व शेतकरी बांधवांसाठी एनए टॅक्स, गौणखनिज सवलत, पाणंद रस्ते, यासह कल्याणकारी शासन निर्णयांची माहिती दिली. तसेच शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी शिबीरात उपलब्ध असल्याचेही नमुद केले. निवेदक आकाश वडघुले यांनी सुत्रसंचालन केले तर मंडल अधिकारी गुलफाम शेख यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button