ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पित करण्याची जिद्द हवी : डॉ. चंद्रकांत पाटील
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी शाखेच्या वतीने आयोजित सभासद पाल्य गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न

पुणे : “विद्यार्थ्यांनी केवळ बौद्धिक प्रगतीवर भर न देता शारीरिकदृष्ट्याही सक्षम बनले पाहिजे. नुसते उत्साही राहून चालत नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन त्यासाठी सर्वस्व समर्पित करण्याची तयारी असणे आवश्यक आहे. ध्येयपूर्तीसाठी समर्पण, सातत्य आणि कठोर परिश्रम हेच यशाचे खरे सूत्र आहे,” असे प्रतिपादन सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी, मुंबईचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत पाटील यांनी केले.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या शाखेच्या वतीने आयोजित सभासद पाल्य गुणगौरव समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
डॉ. पाटील म्हणाले, “राज्यात सुमारे सात हजार सहकारी संस्था कार्यरत आहेत. त्यामध्ये सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीने शिक्षकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी उल्लेखनीय कार्य उभारले आहे. संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत तब्बल ३३ कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे. शिक्रापूर शाखेतील तीन सभासदांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना ३३ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून, शिक्षकांच्या अडचणीच्या काळात संस्था खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहते.”
यावेळी शिरूर तालुका प्राध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य रामदास थिटे यांनी विद्यार्थ्यांच्या यशामागील मेहनतीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “शिरूर तालुका हा गुणवत्तेची मजबूत पायाभरणी असलेला तालुका आहे. विद्यार्थ्यांचे यश हे प्रयत्न, पात्रता, परिस्थिती, सातत्य आणि वेळेच्या नियोजनाचा एकत्रित परिणाम असतो. अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करणे हे समाजाचे कर्तव्य आहे आणि सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज सोसायटी हे कार्य सातत्याने पार पाडत आहे.”
प्राचार्य थिटे यांनी शिरूर तालुक्याच्या शैक्षणिक यशाचा आढावाही मांडला. त्यांनी सांगितले की, फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षेत बारावीचा निकाल ९२.४९ टक्के, तर दहावीचा निकाल ९५.७९ टक्के लागला. याशिवाय स्पर्धा परीक्षांमधील प्रशासकीय अधिकारी, पाचवी-आठवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये तालुक्यातील विद्यार्थी सातत्याने उल्लेखनीय यश मिळवत आहेत. ही कामगिरी संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्राप्त मुख्यमंत्री सहकार समाजसेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने डॉ. चंद्रकांत पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला सेकंडरी School एम्प्लॉईज सोसायटीचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे, खजिनदार सतेज शिंदे, सहसचिव सतीश माने, संचालक सचिन नलावडे, प्रमोद देशमुख, जगन्नाथ जाधव, राज्य आश्रमशाळा महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. तुकाराम शिरसाट, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सहसचिव मारुती कदम, शाखा व्यवस्थापक शांताराम विरकर, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव बाळासाहेब चव्हाण, सहसचिव अशोकराव दहिफळे, उपाध्यक्ष रामनाथ इथापे, विद्या सचिव संतोष दौंडकर, मुख्याध्यापक मोहन दरेकर, शिरूर-हवेली शिक्षक संघाचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र थिटे, शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल गवारी यांच्यासह शिक्षक, मुख्याध्यापक, सभासद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्रापूर शाखेचे पालक संचालक प्राचार्य तुकाराम बेनके यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक तज्ज्ञ संचालक गुलाबराव गवळे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. प्रकाश चव्हाण यांनी केले.



