शतकानुशतके प्रेरणादायी ठरणारा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास राष्ट्रीय अभ्यासक्रमात यावा – गुरुदेव श्री श्री रविशंकरजी
गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांची श्रीक्षेत्र वढु बुद्रुक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधिस्थळी भेट…
पुणे : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम, त्याग अन् कर्तृत्वाचा तेजस्वी इतिहास राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (NCERT) माध्यमातून राष्ट्रीय अभ्यासक्रमात आला तरच धर्मवीर शंभुराजांच्या या जाज्वल्य पराक्रमाचा खरा इतिहास देशातील तरुणाईला समजेल अन् तो शतकानुशतके प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन आर्ट ऑफ लिविंग फाऊंडेशनचे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी केले.
दि आर्ट ऑफ लिविंग फाऊंडेशनचे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी आज श्रीक्षेत्र वढु बुद्रुक येथे भेट देत छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होवून कवी कलश आणि वीर बापुजी शिवले स्मारकालाही भेट देत स्थानिकांशी संवाद साधला. अविनाश मरकळे यांनी यावेळी पौरोहित्य केले. तर वढु बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ. अंजली प्रफुल्ल शिवले यांनी स्मृतिचिन्ह देवून त्यांचा यथोचित सन्मान केला. तर वीर बापुजी शिवले स्मारक मंडळ, शंभुराजे क्रिडा संघ, श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान व ग्रामस्थांच्या वतीने त्याचे स्वागत करण्यात आले.
सध्याच्या धर्मांतरणाबद्दल चिंता व्यक्त करताना ते म्हणाले, सध्या किरकोळ प्रलाेभनासाठी कमजोर लोक धर्म व नावही बदलतात मात्र कोणत्याही आमिषाला बळी न पडता असह्य यातना सहन करीत शुरवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी ३२ व्या वर्षी आत्मबलिदान दिले, हे अत्यंत प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र अशीच मर्यादित माहिती असलेल्या इतिहासात शंभुराजांच्या अत्यंत पराक्रमी व्यक्तीमत्वाचा आदर्श इतिहास आजच्या तरुणाईसमोर राष्ट्रीय अभ्यासक्रमातून आला पाहीजे. तुळजा भवानी मातेवर नितांत श्रद्धा असलेल्या छत्रपती शिवाजीराजेंना त्यांच्यामुळेच स्वराज्य संरक्षणासाठी बळ मिळत असे. त्यामुळे ‘जय भवानी जय शिवाजी’ ही घोषणा आजही अत्यंत प्रेरणादायी आहे.
शिवले परिवाराचे योगदान…
छत्रपती शिवाजीराजे व शंभुराजे यांचे भक्ती, शक्ती, युक्ती हे गुणही तरुणाईने आत्मसात केले पाहीजेत, असे सांगताना त्यांनी वीरता व शुरता जपणाऱ्या येथील शिवले परिवाराचेही योगदान मोठे असल्याचे सांगत शिवले परिवाराचेही कौतुक केले. तसेच वढु बुद्रुक परिसराच्या विकासासाठी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग फौंडेशन’च्या माध्यमातून शक्य ते प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
यावेळी विद्यमान सरपंच सौ. अंजली प्रफुल्ल शिवले, माजी सरपंच सौ. सारिका अंकुश शिवले, प्रफुल्ल शिवले, अंकुश शिवले, अनिल शिवले, उपसरपंच राहुल कुंभार, अनंत युवा प्रतिष्ठाणचे संस्थापक शांताराम कटके, केसनंदचे सरपंच प्रमोद हरगुडे, सणसवाडीचे रामदास दरेकर, वढुचे माजी उपसरपंच संतोष शिवले, लालाशेठ तांबे, रमाकांत शिवले, संजय शिवले, ग्रामपंचायत सदस्य माऊली भंडारे, कृष्णा आरगडे, संगीता सावंत, स्वप्निल शिवले, सोसायटी चेअरमन कांताराम आरगडे, सचिन शिवले, बबनराव शिवले, संभाजी आप्पा शिवले, गोरक्ष शिवले, साहेबराव भंडारे, पेरणेचे उपसरपंच अक्षय वाळके, माजी सरपंच रुपेश ठोंबरे, शिवाजी वाळके, माजी चेअरमन राजेंद्र आहेर, संजय शिवले, हरी शिवले, मंगेश शिवले, लक्ष्मणराव भंडारे, नीलम देशमुख आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांनी स्वागत केले. तर माजी चेअरमन सचिन शिवले यांनी सुत्रसंचालन केले. तर माजी सरपंच अंकुश शिवले यांनी आभार मानले.