तुळापूर (ता. हवेली) येथे शैक्षणिक साहित्य वाटप व गुलाबपुष्प देऊन प्रवेशोत्सव साजरा तर विद्यालयास पालखी भेट
तुळापुरात जय शिवराय प्रतिष्ठान संचलित धर्मवीर संभाजीराजे माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

पुणे : शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच तुळापूर (ता. हवेली) येथे जय शिवराय प्रतिष्ठान संचलित धर्मवीर संभाजीराजे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व गुलाबपुष्प देऊन प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

तुळापुरचे माजी सरपंच ज्ञानेश्वर शिवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी लोणीकंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गजानन कागणे आणि वरिष्ठ पत्रकार शरद पाबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी तुळापुरचे माजी उपसरपंच राहुल राऊत, नारायण खुळे, विक्रम शिवले आदी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तर सांस्कृतिक उपक्रमांसाठी आवश्यक पालखी, छत्र आणि चामरे बाळासाहेब आनंदा शिवले यांनी देणगी स्वरूपात प्रदान केली.
यावेळी दहावीत घवघवित यश संपादन करणाऱ्या श्रावणी किसन शिवले, चैत्राली मोहन जठार, प्रज्ञा प्रदीप शिवले, अथर्व राजेंद्र शिवले आणि अक्षय अर्जुन मोरे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये श्रावणी किसन शिवले (प्रथम क्रमांक ५,००० रुपये), चैत्राली मोहन जेठार (द्वितीय क्रमांक २,००० रुपये), प्रज्ञा प्रदीप शिवले (तृतीय क्रमांक – २,००० रुपये), अथर्व राजेंद्र शिवले (चतुर्थ क्रमांक १,००० रुपये) आणि अक्षय अर्जुन मोरे (पाचवा क्रमांक १,००० रुपये) यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच, विद्यार्थ्यांना प्रेरणादायी बक्षीस स्वरूपात भेटवस्तू उद्योजक राहुल राऊत आणि फुलगावचे माजी सरपंच नारायण खुळे यांच्याकडून देण्यात आल्या. सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप युवा उद्योजक विक्रम शिवले यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी युवा उद्योजक राहुल राऊत, खंडू शिवले, विक्रम शिवले, प्रगतशील शेतकरी बाळासाहेब आनंदा शिवले, माजी सरपंच जयवंत शिवले, माजी उपसरपंच राजाराम शिवले तसेच संदीप चौधरी-शिवले उपस्थित होते.
विद्यालयाचे मुख्याध्यापक आबा जाधव यांनी प्रास्ताविकात शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा व सुविधांचा आढावा मांडला. तर सूत्रसंचालन श्रीमती सालके यांनी केले. तर सहशिक्षक शेकडे सर यांनी आभार मानले. शाळेच्या प्रगतीचा आणि सर्व वर्गखोल्यांच्या डिजिटलायझेशनचा आढावा घेतल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.
शाळेच्या पहिल्या दिवशी ८५ टक्के उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना पोषण आहारात लापशी व सांबर-भात देण्यात आला. शाळेत अत्यंत स्वच्छ व सुंदर शैक्षणिक वातावरण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले होते. विद्यार्थ्यांचा हा पहिला दिवस अत्यंत आनंददायी आणि संस्मरणीय ठरला.
………….…….



