शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियानात श्री जातेगावचे संभाजीराजे विद्यालय जिल्ह्यात अव्वल
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्था अध्यक्ष कांतीलाल उमाप, उपाध्यक्ष सुगंधराव उमाप आणि सचिव प्रकाश पवार यांच्याकडून शिक्षक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन

पुणे : पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग आणि पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान (टप्पा-२) २०२५-२६ मध्ये जातेगाव बुद्रुक येथील श्री संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने आठवी ते १२ वी गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पार पडलेल्या पारितोषिक वितरण समारंभात शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते विद्यालयाला जिल्हा प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाला राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर, पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर, राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड, सचिव शिवाजीराव कामथे, कार्याध्यक्ष राजेश गायकवाड, उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे, प्राचार्य शिवाजी शिंदे, किशोर बोरसे, सुरेश कांचन, बाळासाहेब चव्हाण, विश्वस्त अरुण थोरात, शिवाजीराव किलकिले, विविध शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विद्यालयाचे प्राचार्य रामदास थिटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान या अभियानाचा दुसरा टप्पा राबविण्यात आला. जिल्ह्यातील तब्बल १६२० शाळांचे सहा प्रमुख निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. या मूल्यमापनात विद्यालयातील आयुर्वेद वनस्पती बाग, अत्याधुनिक संगणक व विज्ञान प्रयोगशाळा, शिक्षकांचे विषयनिहाय नियोजन, नियमित सराव चाचण्या व विद्यार्थ्यांचे मूल्यमापन, इंटरॲक्टिव्ह पॅनेलद्वारे अध्यापन, शास्त्र व माध्यमिक विभागातील १०० टक्के निकाल परंपरा, तसेच सहशालेय उपक्रम आणि भौतिक सुविधांचा समावेश होता. या सर्व घटकांत उत्कृष्ट कामगिरी करत विद्यालयाने जिल्ह्यात अव्वल स्थान मिळवले.
ग्रामीण भागात इयत्ता ११ वी विज्ञान, कला व वाणिज्य शाखांसाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती, शिष्यवृत्ती परीक्षांतील यश आणि प्रभावी शालेय प्रशासन ही या यशामागील प्रमुख वैशिष्ट्ये ठरली. विशेष म्हणजे, यापूर्वीही ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानात तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवत विद्यालयाने शासनाचे मानांकन प्राप्त केले होते. विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्था अध्यक्ष कांतीलाल उमाप, उपाध्यक्ष सुगंधराव उमाप आणि सचिव प्रकाश पवार यांनी शिक्षक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.



