अधिक मासातील परंपरेला आधुनिकतेची जोड; लोणीकंदमध्ये १२० लेकी-जावयांचा सामूहिक सन्मान
जयेश कंद सोशल फाऊंडेशनने आगळावेगळा उपक्रम राबवत रामनगर परिसरातील तब्बल १२० लेकी आणि जावयांचा केला सामूहिक सन्मान

पुणे : अधिक मासानिमित्त लेकी आणि जावयांना सासुरवाडीत बोलावून पारंपरिक धोंडे जेवणाचा मान देण्याची संस्कृती आजही ग्रामीण भागात जपली जात आहे. याच परंपरेचे जतन करत लोणीकंद (ता. हवेली) येथील जयेश कंद सोशल फाऊंडेशनने आगळावेगळा उपक्रम राबवत रामनगर परिसरातील तब्बल १२० लेकी आणि जावयांचा सामूहिक सन्मान केला. सासुरवाडीत झालेल्या या अनोख्या सामुहिक सन्मानाने जावयांसह लेकीही भारावून गेल्या.

माहेर आणि सासुरवाडी हे प्रत्येक लेकी व जावयाच्या भावविश्वातील जिव्हाळ्याचे नाते मानले जाते. त्यात अधिक मासातील धोंडे जेवणाचे निमंत्रण म्हणजे प्रेम, आपुलकी आणि सन्मानाची अनोखी पर्वणीच. हीच भावना जपत जयेश कंद सोशल फाऊंडेशनने समाजातील सर्व लेकी आणि जावयांना एकत्र आणण्याचा स्तुत्य प्रयत्न केला.

फाऊंडेशनचे अध्यक्ष व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयेश विलास कंद आणि सामाजिक कार्यकर्ते विलास रघुनाथ कंद यांच्या संकल्पनेतून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात १२० लेकी आणि जावयांना पारंपरिक सुग्रास धोंडे जेवणाचा आस्वाद तसेच लेकींना साड्या तर जावयांना पोशाख भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

दरम्यान, याच दिवशी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तसेच लोणीकंद परिसराच्या विकासासाठी योगदान देणारे स्व.अजित पवार यांच्या प्रतिमेसही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास गावातील जावयांसह विविध क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते. समाजातील चांगल्या प्रथा-परंपरा जपत सामाजिक ऐक्य आणि बांधिलकी दृढ करणारा हा उपक्रम असल्याचे सांगत आमदार माऊली आबा कटके यांनी फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.
अधिक मासाला आपल्या संस्कृतीत विशेष महत्त्व असून या काळात समाजोपयोगी परंपरा जपल्या जातात. त्या पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचाव्यात आणि सामाजिक एकोपा वाढावा, या उद्देशाने हा सामूहिक सन्मान सोहळा आयोजित केल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेश कंद यांनी सांगितले.
—————



