टाटा मोटर्स हरित शाळा पुरस्काराने फुल गावातील हरी उद्धव धोत्रे विद्यालयाचा सन्मान

चार लाख रुपये व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप

पुणे : पर्यावरण व स्वच्छता या क्षेत्रात उल्लेखनिय कार्याबद्धल ‘टाटा मोटर्स’कडून फुलगाव (ता. हवेली) येथील हरी उद्धव धोत्रे विद्यालयास द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. चार लाख रुपये व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पिंपरी येथे ‘टाटा मोटर्स’च्या कारखान्यामध्ये झालेल्या पुरस्कार वितरण प्रसंगी टाटा मोटर्सचे पर्यावरण विभागाचे मुख्याधिकारी रोहित कुट्टी, एस.एच.ओ.प्रमुख सिताराम कांडी, प्रमोद चौधरी, अजित पायगुडे, निरंजन अग्रवाल, पर्यावरण परिक्षक सतीश आवटे, वनराईचे परिक्षक बसंत बाबाराव, अहमदाबादचे श्री. सुमनकुमार, शिशुपाल तोमर आदीं सह विविध विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.

तसेच फुलगाव श्री शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय धोत्रे, उपाध्यक्ष नारायणराव खूळे, प्रवीण रायसोनी, खजिनदार नामदेवराव वागस्कर, मुख्याध्यापक सतीश केकाण, कलाशिक्षक श्रीरंग जाधव, विद्यार्थी साईराज वागस्कर, कु. राजनंदिनी शिंदे आदी उपस्थित होते.

हरीत शाळा पुरस्कार स्पर्धेत 5000 शाळांनी सहभाग घेण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. या सर्व शाळांतून 156 शाळा शहरी व ग्रामीण विभागातून निवडण्यात आल्या. सरकारी व खाजगी व्यवस्थापन गटातून सर्व शाळांचे प्रत्यक्ष मूल्यांकन करण्यात आले.

पर्यावरण शिक्षण केंद्राचे सतीश आवटे, वनराईचे बसंत बाबाराव व अहमदाबाद येथील श्री. सुमनकुमार यांनी मूल्यांकन केले. या स्पर्धेत युनिस्कोने प्रामाणित केलेल्या चार विभागाचा समावेश होता. यातून अखेर विजेत्या शाळांची निवड करण्यात आली.

या स्पर्धेत फुलगाव येथील 1860 साली स्थापन झालेल्या व 167 वर्ष शिक्षणाचे योगदान देणाऱ्या हरी उद्धव धोत्रे माध्यमिक विद्यालयास ग्रामीण खाजगी विभागातून द्वितीय क्रमांक मिळाला. एकूण 900 विद्यार्थी शिकत असलेल्या या विद्यालयातील 6500 हजार झाडांचे वृक्षारोपण, सेंद्रिय शेती, गांडूळ खत, रोपवाटिका, कचरा व्यवस्थापन, पानी वापर नियोजन, सौरऊर्जा, बी- बियाणे बँक आदी उल्लेखनीय बाबींची नोंद घेण्यात आली.

येथील शेतकरी कुटुंबातील हे विद्यार्थी स्वच्छता व पर्यावरण संवर्धनासह शाळा व आपल्या घरीही केवळ सेंद्रिय खतांचा वापर करण्याबाबत आग्रही असतात. शाळेला आजवर अनेक पुरस्कार मिळाले असून स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबद्दल किलोस्कर फाऊंडेशन कडून गेली पाच वर्षे स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे.

पर्यावरण संवर्धन व प्रचार प्रचारासाठी ‘टाटा मोटर्स’कडून शाळेला माती परिक्षण प्रयोगशाळा, हवामान दर्शक यंत्र व पूरक साधने देण्यात येणार असून या साधनांचा परिसरातील शेतकऱ्यांसाठीही उपयोग करण्यात येणार असल्याचेही संस्थेच्या वतीने सांगण्यात आले

दरम्यान यावेळी अधिकाऱ्यांनी टाटा कंपनीचा हॅरिअर व सफारी मॉडेल उत्पादनाचा प्रकल्पही दाखवण्यात आला. फक्त महिलाच चालवत असलेल्या या संपूर्ण विभागात 2000 मुली कार्यरत असून येथे दर 3 मिनिटास 1 वाहन तयार होते. तसेच 300 मूकबधिर कर्मचारीही येथे कार्यरत आहेत. कंपनीत अतिशय सुरेख असलेली कँटीन, सुरक्षा व्यवस्थाही महिलांकडूनच चोख ठेवली जाते.

………

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button