₹७५१५ कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे–शिरूर प्रवास होणार वेगवान; कोंडी टाळण्यासाठी पर्यायी ३० मीटर रुंदीच्या आर.पी. रस्त्यांचे भूसंपादनासह काम तातडीने करा – आमदार माऊलीआबा कटके

पुणे–शिरूर महामार्गावरील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा; १८ जुलैला सहापदरी उन्नत महामार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन

कोंडी टाळण्यासाठी पर्यायी ३० मीटर रुंदीच्या आर.पी. रस्त्यांचे भूसंपादनासह काम तातडीने पुर्ण करा – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊलीआबा कटके

पुणे : पुणे–शिरूर राष्ट्रीय महामार्गावरील गेल्या अनेक वर्षांपासूनची सततची वाहतूक कोंडी आता इतिहासजमा होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडत आहे. वाघोली, लोणीकंद, सणसवाडी, कोरेगाव भीमा, शिक्रापूर, रांजणगाव आदी भागांतील दैनंदिन वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून उभारण्यात येणाऱ्या पुणे–शिरूर सहापदरी उन्नत (Elevated) महामार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन शनिवारी (१८ जुलै) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते होत आहे.      

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत (MSIDC) पुणे–शिरूर, हडपसर–यवत आणि तळेगाव–चाकण–शिक्रापूर या तीन महत्त्वाच्या उन्नत रस्ते प्रकल्पांची अंमलबजावणी केली जाणार आहे. भूमिपूजन कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खासदार सुप्रिया सुळे व अमोल कोल्हे यांनी ऑनलाइन सहभाग घेतला.

५३.४० किमीचा आधुनिक महामार्ग

केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय आणि राज्य शासनाच्या समन्वयातून मंजूर झालेल्या या प्रकल्पात पुणे ते शिरूर दरम्यान ५३.४० किमी मार्ग विकसित केला जाणार आहे. त्यामध्ये ३५ किमी सहापदरी उन्नत मार्ग, १८.४० किमी सहापदरी समांतर (अॅट-ग्रेड) मार्ग, ३ मोठे जंक्शन, ११७ लहान जंक्शन, ८ ठिकाणी रॅम्प आणि भविष्यातील ७ किमी मेट्रो मार्गासाठी जागेची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक व लांब पल्ल्याच्या वाहतुकीचे स्वतंत्र नियोजन होऊन सिग्नलविरहित प्रवास शक्य होणार आहे.

प्रवासाचा वेळ होणार एक तासाने कमी, उद्योगांना चालना

सध्या या मार्गावर दररोज सुमारे २.४० लाख पीसीयू वाहतूक होत असून ती पुढील काळात २.७० लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे–शिरूर प्रवासाचा वेळ सुमारे एका तासाने कमी होणार असून पुणे, शिरूर, चाकण, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर तसेच मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे.

₹७,५१५ कोटींचा प्रकल्प

५३.४० किमीच्या या प्रकल्पासाठी ₹७,५१५ कोटींची तरतूद करण्यात आली असून काम चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रकल्प ३० वर्षांच्या सवलत कालावधीसह BOT/DBFOT तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. या पद्धतीत कंत्राटदार कंपनी प्रकल्पाची उभारणी, निधी, संचालन व देखभाल करून टोलद्वारे गुंतवणूक वसूल करेल आणि नंतर प्रकल्प शासनाकडे हस्तांतरित करेल.

आधुनिक तंत्रज्ञान व मेट्रोसाठी तरतूद

या महामार्गावर रिअल-टाइम ट्रॅफिक मॉनिटरिंग, FASTag आधारित टोल, सीसीटीव्ही, डिजिटल टोल व्यवस्थापन आणि Tamper Proof डेटा प्रणालीचा वापर केला जाणार आहे. तसेच भविष्यातील पुणे मेट्रो विस्तारासाठी सुमारे ७.४० किमी मार्गावर जागा राखीव ठेवण्यात आली असून कटकेवाडी (वाघोली) पर्यंत मेट्रो विस्ताराचा मार्ग मोकळा होणार आहे. रांजणगाव व शिरूरपर्यंत मेट्रो वाढविण्याची मागणी मात्र कायम आहे.

उद्योग, शेती व सुरक्षित वाहतुकीला लाभ

या प्रकल्पामुळे केसनंद, सणसवाडी, शिक्रापूर, रांजणगाव एमआयडीसी तसेच पुणे–अहिल्यानगर औद्योगिक पट्ट्याला वेगवान संपर्क मिळेल. कृषीमाल वाहतूक, लॉजिस्टिक्स, उद्योग गुंतवणूक, रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. लांब पल्ल्याची व स्थानिक वाहतूक स्वतंत्र झाल्याने अपघातांचे प्रमाण, इंधनाचा अपव्यय व प्रदूषणही कमी होण्यास मदत होणार आहे.

गेमचेंजर’ ठरणारा प्रकल्प

पुणे–शिरूर महामार्गावर वाहतूक कोंडी, वेळेचा अपव्यय, इंधनाची नासाडी आणि अपघात यांमुळे नागरिक अनेक वर्षांपासून त्रस्त आहेत. १८ जुलै रोजी होणाऱ्या भूमिपूजनानंतर या बहुप्रतीक्षित प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून पुढील चार वर्षांत हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे–शिरूरसह संपूर्ण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा महामार्ग राज्याच्या आर्थिक विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

…………………………

पर्यायी ३० मीटर रुंदीच्या आर.पी. रस्त्यांचे भूसंपादनासह काम तातडीने पुर्ण करा – आमदार कटके

“शिरुर-हवेली विधानसभा मतदार संघात सततच्या वाहतुक कोंडीवर उपाययोजनेबाबत शासनदरबारी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. पुणे–शिरूर , तळेगाव–चाकण–शिक्रापूर (२६.३० किमी उन्नत व ५३.२० किमी समांतर महामार्ग-₹३,९२३.८९ कोटीं) आणि हडपसर–यवत (२५.८० किमी उन्नत व ३१.६५ किमी समांतर महामार्ग आणि ९.७५ किमी प्रस्तावित मेट्रो मार्ग – ₹५,२६२.३६ कोटीं)या तिनही प्रकल्पाचे काम सुरु होत असल्याने मतदार संघातील कोडींची समस्या सुटणार असल्याचे समाधान आहे. या प्रकल्पांमुळे उद्योग, शेती, व्यापार आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रवासालाही मोठा दिलासा मिळेल. शासनाने या तिन्ही प्रकल्पांच्या पुर्ततेसाठी एमएसआयडीसीच्या माध्यमातून ठोस नियोजन केले आहे. मात्र, हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी चार वर्षांचा कालावधी असल्याने यादरम्यान वाघोली, लोणीकंद व परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा आणखी त्रास सहन करावा लागू नये, यासाठी वाघोली जकात नाका–केसनंद रोड ते कटकेवाडी तसेच लोहगाव हद्द ते कटकेवाडी या ३० मीटर रुंदीच्या आर.पी. रस्त्यांचे भूसंपादनासह काम तातडीने सुरू करावे, अशी आग्रही मागणी बैठकीत केली आहे. हे पर्यायी रस्ते लवकर कार्यान्वित झाल्यास नागरिकांना तात्काळ दिलासा मिळेल आणि उन्नत मार्गाच्या कामालाही गती मिळेल.”

माऊली कटके, आमदार, शिरुर-हवेली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button