महत्वाकांक्षी उन्नत महामार्गाला स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव द्या – आमदार माऊली आबा कटके
विविध रस्ते विकासकामांची आमदार माऊलीआबा कटके यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

पुणे : पुणे–शिरूर मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्याबरोबरच परिसरातील रस्ते आणि पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊलीआबा कटके यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे विविध महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये उन्नत महामार्ग प्रकल्पाला स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशीही प्रमुख मागणी करण्यात आली.

एमएसआयडीसीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या पुणे – शिरुर, तळेगाव – चाकण – शिक्रापूर, हडपसर – यवत या ३ उन्नत मार्गांच्या प्रकल्पांच्या भूमिपूजन गणेश कला क्रीडा मंच, पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी आमदार कटके यांनी मुख्यमंत्री, गडकरी तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी संवाद साधत या उन्नत महामार्ग प्रकल्पाला स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी केली तसेच परिसरातील जोड रस्ते आणि पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकास व्हावा, याकडेही निवेदनाद्वारे लक्ष वेधले.
निवेदनात आधुनिक उन्नत महामार्ग प्रकल्पासाठी तसेच परिसराच्या विकासासाठी स्वर्गीय अजितदादा पवार यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांच्या स्मरणार्थ हा निर्णय घ्यावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता वाघोली–लोहगाव रस्त्याचे चौपदरीकरण तातडीने करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच वाघोली ते केसनंद राष्ट्रीय महामार्ग जोडरस्त्याचेही चौपदरीकरण करून नागरिकांना सुरक्षित व सुरळीत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
केसनंद परिसरातील वाहतूक कोंडी ही नागरिकांसाठी मोठी समस्या बनली असून, केसनंद चौकात ग्रेड सेपरेटरच्या धर्तीवर भूमिगत (अंडरग्राउंड) मार्ग उभारण्यात यावा, अशीही महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे. या उपाययोजनेमुळे चौकातील वाहतूक सुरळीत होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
तसेच, मांजरी ते कोलवडी या रस्त्याचे रुंदीकरण करून परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि औद्योगिक वाहतुकीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
आमदार माऊली कटके यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या या मागण्यांमुळे पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होईल. तसेच वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर रस्ते आणि वाहतूक सुविधांमध्ये सुधारणा झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.



