वहिनीचा खून करून पसार झालेल्या दिराला लोणीकंद पोलिसांनी केले जेरबंद
लोणीकंद पोलिसांनी शिताफीने जिल्हा परिषद शाळेजवळ सापळा लावून जेरबंद करीत दिले शिरगाव पोलिसांच्या ताब्यात
पुणे : शिरगाव परंदवाडी येथे थंड डोक्याने वहिनीचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावून पसार झालेल्या दिराला लोणीकंद पोलिसांनी जेरबंद केले आहे. तपासात त्याच्यावर खुन दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, यासह मोक्का सारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले असून गणेश चव्हाण याला अधिक तपासासाठी शिरगाव पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
गणेश रामभाऊ चव्हाण (वय २१, रा. शिरगाव, मावळ) असे जेरबंद करण्यात आलेल्या आरोपिताचे नाव आहे. याबाबत पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश चव्हाण हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मयत वहिनी सुनंदा यांनी पोलिसांना दिली होती. तीन वर्षापुर्वी अटक झाल्यानंतर तो एक महिन्यापूर्वी तुरुंगातून सुटला. गणेश व त्याचा मोठा भाऊ लक्ष्मण यांनी हा राग मनात धरून सुनंदा चव्हाण हिचा डोक्यात दगड घालून खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रेतही डोंगरा लगतच्या जमिनीत पुरुन टाकले.
दरम्यान बहिणीचा फोन नसल्याने सुनंदा यांचा भाऊ शाम यांनी सासरी चौकशी केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने त्यांनी बहीण बेपत्ता असल्याची तक्रार पोलीसांकडे दिली. यावरून पोलीसांनी वेगाने तपास केला असता सुनंदा यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी आणखी एका महिला अटक केली. मात्र या दरम्यान गणेश चव्हाण मात्र फरार झाला होता.
दरम्यान गणेश चव्हाण हा लोणीकंद परिसरात येत असल्याची माहिती लोणीकंद पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पक्की खबर काढून पोलिसांनी लोणीकंद परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ सापळा लावून त्याला जेरबंद केले. चौकशीत त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समजले. शिरगाव परंदवाडी येथे वहिनीचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावल्यानंतर मटण पार्टी करणाऱ्या गणेश चव्हाण याला अधिक तपासासाठी शिरगाव पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.