वाडेबोल्हाई येथील स्कूलबसच्या अपघाताने शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
‘द’ रायझिंग स्टार इंग्लीश स्कूलच्या बसचा वाडेबोल्हाई हद्दीत चालकाचा ताबा सुटून अपघात
पुणे : केसनंद-वाडेबोल्हाई रस्त्यावर वाघोली (ता. हवेली) येथील द रायझिंग स्टार इंग्लीश स्कूलची बस वाडेबोल्हाई हद्दीत चालकाचा ताबा सुटून रस्त्यालगतच्या झाडावर आदळली. या अपघातात एक वृध्द महिला गंभीर तर दोन शाळकरी मुले किरकोळ जखमी झाले. मात्र या अपघातामुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जखमींवर रुग्णालयात उपचार चालू आहेत, याबाबत लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास फुलमाळा, वाघोली येथील द रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलची बस (क्र.एम. एच. १२ एच बी २८३०) घेवून चालक तुकाराम जनार्धन पवार (रा. वाघोली, पुणे) हा मुलांना घेऊन केसनंद-वाडेबोल्हाई रस्त्याने जात असताना चिकूवन गारवा हॉटेलचे समोर बसवरील ताबा सुटल्याने झाडाला धडकून अपघात झाला. यात रस्त्यालगत भाजी विक्री करीत असलेल्या वृद्ध महिला सीताबाई नारायण ढोरे (वय ७०) या खुब्यामध्ये फ्रॅक्चर होऊन जखमी झाले. तर अपघाताच्या धक्क्याने बस मधील दोन शाळकरी मुलेही किरकोळ जखमी झाली. घटनास्थळी स्थानिक नागरीकांनी तातडीने धाव घेत मदतकार्य केल्याने जखमींना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी पाठविण्यात आले.
गुन्ह्याचा पुढील तपास लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. पडळकर हे करीत आहेत. या अपघातामुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून योग्य प्रशिक्षित चालक तसेच सुस्थितीतील बस न पुरवता निष्पाप विद्यार्थी व तसेच नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या शाळा व्यवस्थापन तसेच चालकाच्या निष्काळजीवर आरटीओ प्रशासनाने तपासणी व दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.