डिंग्रजवाडी वन विभागात घनदाट वन निर्मितीचा उपक्रम कौतुकास्पद – आरएफओ निळकंठ गव्हाणे
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डिंग्रजवाडी वनविभाग क्षेत्रात परिसरात दोन हजार वृक्षांची लागवड

पुणे : पर्यावरण संवर्धनासाठी डिंग्रजवाडी (ता.शिरूर) ग्रामस्थांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने परीसरातील स्थानिक कारखान्याच्या सहकार्याने दोन हजार दोन झाडांची लागवड करून घनदाट नागरी वन (Dense Urban Forest) निर्माण करण्याचा हाती घेतलेला उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगत शिरूर वनपरिक्षेत्राचे अधीक्षक निळकंठ गव्हाणे यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले.
या उपक्रमासाठी शिरूर वनपरिक्षेत्राचे अधीक्षक निळकंठ गव्हाणे, उपअधीक्षक सौ. रूपा जगताप, मेजर सोपान अनसुने, श्री.झिरपे वनपाल श्री. हरगुडे, वन कर्मचारी दादा जाधव, डिग्रजवाडीचे माजी सरपंच यशवंत गव्हाणे, नारायण गव्हाणे, राजाराम दरेकर, पोपट ढेरंगे, यशोदा माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक अध्यक्ष खंडुआण्णा भारत गव्हाणे तसेच कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
वाढते रहदारीकरण, प्रदूषण आणि हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी वृक्षारोपणा बरोबरच लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी वनविभाग, स्थानिक प्रशासन, उद्योजक व ग्रामस्थांनी संयुक्तपणे स्वीकारल्याने भविष्यात गावपरिसर समृद्ध हरित पट्टा म्हणून विकसित होईल, असा विश्वासही यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
डिग्रजवाडी वन परिसरातील दोन एकर क्षेत्रावर हा वृक्षारोपण प्रकल्प राबविण्यात येत असून या घनदाट वनामुळे स्थानिक व जैवविविधतेचे संवर्धन, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा, कार्बन शोषण क्षमता वाढ आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यास मोठी मदत होणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाचे हे क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यशोदा माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक अध्यक्ष खंडुआण्णा गव्हाणे यांनी सांगितले.
……….