ग्रामीण प्रतिभावंत तरुणाईकडून साहित्यनिर्मिती ही कौतुकास्पद बाब – प्रबोधनकार उत्तमआण्णा भोंडवे
शेखर खंडेराव फराटे लिखित 'पारावरच्या गोष्टी' या पुस्तकाचे प्रकाशन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
पुणे : ग्रामीण भागातील प्रतिभावंत तरुणाने लेखक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून कादंबरी, कथासंग्रह लिहिणे ही बाब खूप अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार प्रबोधन केंद्र अध्यक्ष व संत तुकाराम स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे प्रमुख उत्तमआण्णा भोंडवे यांनी ‘पारावरच्या गोष्टी’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी काढले.
पेरणे (ता. हवेली) येथे मांडवगण फराटा येथील शेखर खंडेराव फराटे लिखित ‘पारावरच्या गोष्टी’ या पुस्तकाच्या प्रकाशन उत्तमआण्णा भोंडवे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी ते बोलत होते. माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण बापू फराटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, व्याख्याते कुंडलिक कदम, व्याख्याते संतोष परदेशी, नानासाहेब गावडे, संदीप ढमढेरे, खंडेरावआण्णा फराटे, श्री. उदमले सर, सा.ना.काळे, एकनाथ फराटे, सुभाष ढवळे, विठ्ठल वळसे, आकाश भोरडे, तात्यासो ढवळे, आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भोंडवे पुढे म्हणाले, लेखक हा नेहमीच वस्तुस्थिती मांडून समाजात चांगले विचार पेरण्याचे काम करत असतो. लेखक हा आयुष्यात सगळी पात्रं अनुभवत असतो. पुस्तक लिहण्याचे काम एका दिवसात होत नाही. त्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागतात. शेखर फराटे यांची तिनही पुस्तके वाचनीय आहेत. उत्तम यशासाठी तरुणाईने अधिकाधिक वाचनही केले पाहिजे, असे आवाहनही उत्तमआण्णा भोंडवे यांनी केले.
तर पुस्तक म्हणजे एक चांगला मित्र असून संस्कारक्षम वयात पुस्तक वाचनाने माणसाचे व्यक्तिमत्व व चरित्र घडते, त्यामुळे वाचन महत्वाचे असून वाचनसंस्कृती जोपासण्यात फराटे यांच्या सारख्या लेखकांचेही मोठे योगदान असल्याचे शरद पाबळे यांनी नमुद केले.
तर जेव्हा लेखक तयार होतो, तेव्हा लेखकाच्या नावाबराेबरच गावाचाही नावलौकीक वाढत असल्याचे सांगून माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण बापू फराटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शेखर फराटे यांच्या लेखनाचे कौतुक केले.
तर आई-वडिल व कुटूंबाच्या पाठबळामुळेच आपणांस हे यश मिळाल्याचे नमुद करुन शेखर फराटे म्हणाले, आईवडील, गुरुजनांप्रमाणेच पुस्तकेही आपले मार्गदर्शक असतात. पुस्तक वाचनातूनच लिखाणाची कला अधिक समृद्ध होत जाते.’ व्याख्याते कुंडलिक कदम यांनी प्रास्ताविक केले. कवी मनोहर परदेशी यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले. तर निलम फराटे यांनी आभार मानले.