ग्रामीण भागातील महिलांनी आपल्यातील कला कौशल्ये विकसित करुन कुटुंबाची प्रगती साधावी – सुनेत्रा ताई पवार
हवेली तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष कु. जयेश विलास कंद यांच्या पुढाकाराने व जयेश कंद सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या हळदीकुंकू समारंभात महिलांना केले मार्गदर्शन
पुणे : सध्याच्या काळात महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर असताना ग्रामीण भागातील महिलांनीही न्युनगंड न बाळगता आत्मविश्वासाने आपल्यातील कला कौशल्ये विकसित करावीत, व स्वत:सह कुटुंबाची प्रगती साधावी, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी व बारामती टेक्स्टाईल्सच्या अध्यक्षा सौ. सुनेत्राताई पवार यांनी व्यक्त केली.
हवेली तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष कु. जयेश विलास कंद यांच्या पुढाकाराने व जयेश कंद सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या हळदीकुंकू समारंभात त्या बोलत होत्या. या प्रसंगी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेशआण्णा घुले, महानंदाच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई नागवडे, जिल्हाध्यक्षा मोनिकाताई हरगुडे, तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर माजी जिल्हा परिषद सदस्या अर्चना कटके, सोमेश्वर पतसंस्थेच्या अध्यक्षा पुजा प्रदिप कंद, तुळापूरच्या माजी सरपंच लोचन शिवले, अ.भा.नाट्य परिषदेच्या दिपाली शेळके आदींसह आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना सौ. सुनेत्राताई पवार म्हणाल्या, ‘नेहमीच कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि दगदग यात व्यस्त असलेल्या महिला वर्गासाठी हळदी कुंकु समारंभ हा एक स्नेहमेळावाच असतो. या निमित्तानं एकमेकांच्या भेटीगाठी, संवाद ही त्यांच्यासाठी पर्वणी ठरते. सध्याच्या काळात विविध क्षेत्रात महिला आघाडीवर असताना ग्रामीण भागातील महिलांनीही मागे न राहता आपल्यातील कला कौशल्ये विकसित करुन कुटुंबाची अधिक चांगली प्रगती साधावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
तर महान नेते घडविण्यात त्यांच्या मातांचेच मोठे योगदान असल्याचे सांगत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष जयेश कंद यांनी सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीने येथील सर्व महिलाभगिनींनाही प्रोत्साहन व पाठबळ मिळणार असल्याचा विश्वास आपल्या स्वागतपर मनाेगतात व्यक्त केला. सौ. सुनेत्राताई पवार यांनी शिरूर-हवेली मतदारसंघांत थेऊर, तुळापूर व लोणीकंद येथे विविध कार्यक्रमानिमित्त सदिच्छा भेट देत महिलांशीही संवाद साधला. तसेच तिळगुळ आणि शुभेच्छाही दिल्या. या दौऱ्यात त्यांनी विविध कार्यकर्त्यांच्या घरी भेटीही दिल्या.
सुरुवातीला थेऊर येथे चिंतामणीचे दर्शन घेतले. तर तुळापूर येथे स्वराज्यरक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळी दर्शन घेऊन तेथे राज्य सरकारच्या माध्यमातून होणाऱ्या साकार होणाऱ्या राष्ट्रीय स्मारकाची माहिती घेत येथील काम निश्चितच चागले होईल, असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या माजी तालुकाध्यक्षा व तुळापूरच्या माजी सरपंच सौ.लोचनताई शिवले यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. व नव्याने सुरू केलेल्या व्यवसाय व फार्म हाऊसला भेट देवून विदेशी भाजीपाल्यांची माहितीही घेतली .