ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्याकडून स्व.डॉ.चंद्रकांत कोलते यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट, जुन्या आठवणींना दिला उजाळा !

समाजकारण, वैद्यकीय सेवा व राजकारणाच्या माध्यमातून उल्लेखनिय कार्य करीत समाजात आपल्या वैशिष्ट्यपुर्ण कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे डॉ.चंद्रकांत कोलते यांचे हृदयविकाराने निधन

पुणे : समाजकारण, वैद्यकीय सेवा व राजकारणाच्या माध्यमातून उल्लेखनिय कार्य करीत स्व.डॉ.चंद्रकांत गंगाराम कोलते यांनी समाजात आपल्या वैशिष्ट्यपुर्ण कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवला.  डॉ.कोलते यांचे २५ ऑगस्ट रोजी हृदय विकाराने झालेल्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांनी आवर्जुन वेळ काढत शनिवारी (दि. ३०) त्यांच्या वाघोली मधील निवासस्थानी पदाधिकाऱ्यांसह भेट देत कोलते कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्या समवेत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, प्रवक्ते अंकुश काकडे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदिंसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदानामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी डॉ.कोलते यांचे संघटनात्मक तसेच वैयक्तिक स्नेहाचे संबंध होते. या भेटीत त्यांनी कोलते यांचे चिरंजीव डॉ. चेतन, पत्नी डॉ.स्मिता कोलते, कन्या डॉ. सई, अपूर्वा, स्नुषा डॉ. ऋचा यांच्यासह इतरांशी संवाद साधत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

   ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या हवेली तालुक्यातील पक्ष संघटनात हवेली तालुका अध्यक्ष म्हणून स्व. डॉ. चंद्रकांत कोलते यांचे भरीव योगदान होते. आपल्या कार्यकर्तृत्वाने मोठा जनाधार निर्माण करणारे राजकारणातील शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

     वैद्यकीय क्षेत्रात समाजातील विविध घटकांना वैद्यकीय सेवा देत असताना त्यांनी ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन तसेच नॅशनल इंटीग्रेटेड मेडीकल असोसिएशनच्या माध्यमातूनही त्यांनी भरीव कार्य केले आहे.

   तसेच वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रात तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून राजकीय क्षेत्रातही त्यांनी भरीव योगदान दिले. तर शेतकरी व समाजातील चांगल्या उपक्रमासाठी त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला.

समाजात सकारात्मक परिवर्तन व्हावे, यासाठी राष्ट्रीय जनहित परिषदेचे अध्यक्ष तसेच गाथा परिवार महाराष्ट्र राज्य या संस्थांच्या प्रमुख पदाच्या माध्यमातूनही त्यांनी भरीव योगदान दिले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन विविध संघटनांकडून त्यांना गौरवण्यात आले होते. वाघोली डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीनेही त्यांना प्रथम जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

  गोव्याचे मुख्यमंत्री व पेशाने आयुर्वेदिक वैद्य असलेल्या डॉ.प्रमोद सावंत यांच्याशीही वैद्यकीय क्षेत्रातील निमा संघटनेच्या माध्यमातून डॉ. कोलते यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

……..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button