कोरेगाव भीमाच्या सरपंचांची ‘लाल किल्ल्यावर’ गगनभरारी
लाल किल्ल्यावरील ध्वजवंदनास कोरेगाव भीमाचे सरपंच संदिप ढेरंगे यांना सपत्नीक विशेष निमंत्रण

पुणे : देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या राष्ट्रध्वज वंदनाच्या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमाचे सरपंच संदीप ढेरंगे यांना सपत्नीक विशेष निमंत्रण मिळाले आहे. हा बहुमान मिळाल्याने कोरेगाव भीमा गावची गौरवास्पद ओळख आता देशपातळीवर पोहोचणार असल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
मंगळवारी (ता.१२) सरपंच ढेरंगे हे सपत्नीक दिल्लीकडे रवाना होणार असून दिल्लीत १३, १४ व १५ ऑगस्टला पंचायतराज मंत्रालयाकडून नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत होणारे मार्गदर्शन, अनुभव कथन तसेच ध्वजवंदन सन्मानासह विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
भारताचा स्वातंत्र्यदिन आणि लाल किल्ला या दोन संकल्पना साक्षात भारतीय अस्मितेचे प्रतीक आहेत. या पवित्र स्थळी देशभरातून केवळ १७ सरपंचांची निवड होणं आणि त्यात सरपंच संदीप ढेरंगे यांच्या रूपात पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व होणं, हे निश्चितच गौरवाची आणि गर्वाची बाब आहे. विशेष म्हणजे ते एकमेव प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातून निवडले गेले आहेत, हे त्यांच्या नेतृत्वगुणांनाही अधोरेखित करतं.
गावाच्या विकासासाठी सातत्याने झटणाऱ्या व दुसऱ्यांदा सरपंच पद भूषवणाऱ्या संदीप ढेरंगे यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असेच आहे. “स्मार्ट कोरेगाव भीमा” ही संकल्पना केवळ घोषणांपलीकडे जाऊन कृतीमध्ये उतरवण्याचा त्यांचा प्रयत्न मोलाचा ठरला आहे. गावात पाणीप्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी वनजमिन व शासन निधी मिळवण्यापासून ते स्थानीय गरजांसाठी विविध मंत्रालयांद्वारे यशस्वी पाठपुरावा करण्यापर्यंत ढेरंगे यांनी दाखवलेले नेतृत्व हे ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींमध्ये एक प्रेरणास्त्रोतच ठरेल.
या संधीमुळे एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा उत्तम उद्योजक झाला आणि त्यानंतर गावाच्या प्रगतीसाठी समर्पित लोकसेवकही झाला, ही प्रगतीची कहाणी लाल किल्ल्याच्या प्रांगणात पोहोचून आणखीनच उजळून निघणार आहे. तसेच त्यांच्या सामाजिक, राजकीय कार्यात त्यांना नेहमीच पाठबळ देणाऱ्या त्यांच्या पत्नी, माजी ग्रामपंचायत सदस्या अंजली ढेरंगे यांनाही याच सोहळ्यास निमंत्रण मिळणे, हे ग्रामीण राजकारणात महिलांनी घेत असलेली भूमिका आणि योगदान यांनाही उचित मान्यता मिळाल्याचे द्योतक असल्याचे सांगत विशेषतः महिला भगिनींनी आनंद व्यक्त केला आहे.
सरपंच संदीप ढेरंगे यांना मिळालेला हा बहुमान हा गौरव केवळ कोरेगाव भीमाचा नाही, तर तो पुणे जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा आणि ग्रामीण भारतात विकासाचे नवे मॉडेल उभे करणाऱ्या प्रत्येकाच्या प्रयत्नांचा सन्मान असल्याची भावना व्यक्त करीत कोरेगाव भीमा ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्मिती ग्रामपातळीवरच घडत असल्याने प्रशासकीय यंत्रणांनीही अशा लोकप्रतिनिधींना अधिक संधी, साधने आणि पाठबळ द्यायला हवं, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.



