कोरेगाव भीमा येथे कुणबी दाखल्यांसाठी शिबिरात आलेल्या अनेकांच्या पदरी निराशाच !
कागदपत्रांच्या उपलब्धतेसह शिबीर पुन्हा घेण्याबाबत ग्रामसभेत मांडला ठराव.
पुणे : शासनाने महसुली दफ्तरात आढळलेल्या पुर्वजांच्या कुटुंबीयांच्या कुणबी नोंदींची यादी प्रसिध्द करुन दाखले देण्याबाबत शिबिरेही आयोजित केली, मात्र या शिबिराबाबत तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या पुर्ततेबाबत पुर्वीच्याच पध्दतीने सर्व कागदपत्रे देण्याबाबत पुरेशी पूर्वकल्पनाच नसल्याने कुणबी दाखले मिळण्याच्या अपेक्षेने शिबिरात आलेल्या अनेकांच्या पदरी निराशाच पडली. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी महसुल अधिकाऱ्यांना विचारणा करीत संबंधित कागदपत्रांच्या उपलब्धतेसह हे शिबीर पुन्हा घेण्याबाबत ग्रामसभेतही ठराव मांडला.
कुणबी दाखले मिळण्याच्या आशेने शिबीरात आलेल्या अनेकांना अर्जासोबत जोडायचे सर्व महसुली पुरावे शिरुर तहसिल कार्यालयात जाऊन घेऊन या, तसेच सर्व कागदपत्रांच्या पुराव्यांसह परीपुर्ण अर्ज असल्याशिवाय अर्जच न स्विकारण्याची आडमुठी भुमिका महसुल अधिकाऱ्यांनी घेतल्याने केवळ सोपस्कारासाठीच केलेला हा शिबीराचा फार्स तरी कशासाठी करता ? असा संतप्त सवाल अर्जदारांनी केला.
दरम्यान याचे पडसाद ग्रामसभेतही उमटले. रेकॉर्डमध्ये आढळलेल्या मराठा कुणबी नोंदीनुसार शिबिरात आलेल्या अर्जासोबत आवश्यक असलेली शासनाकडील कागदपत्रे महसूल कर्मचाऱ्यांनीच तात्काळ शोधून संबंधित अर्जाला जोडावीत, तसेच संबधित अर्ज मंजूर करून कुणबी दाखले तातडीने वितरीत करावेत, अशी मागणी करणारा ठराव कोरेगाव भीमा ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत माजी सरपंच विजय गव्हाणे पाटील यांनी मांडला व त्यास राजेंद्र गवदे यांनी अनुमोदन दिले.
तसेच घाईघाईत एक फेब्रुवारीला घेतलेल्या या शिबिराबाबत तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या पुर्ततेबाबतही अनेकांना पुरेशी पूर्वकल्पनाच नसल्याने अनेकजण उपस्थित राहु शकले नाहीत, त्यामुळे या शिबिराचा उद्देशच सफल झाला नसल्याचे अर्जदारांचे म्हणणे आहे.
कोरेगाव भीमा येथील मंडल अधिकारी कार्यालयात पुरेशी आधी पूर्वसूचना देऊन पुन्हा मराठा कुणबी दाखले संदर्भातील शिबिराचे आयोजन करावे, अशी मागणीही करण्यात आली.
तसेच शासनाने प्रसिध्द केलेल्या कुणबी नोंदीची माहीती ही शासकीयच असल्यामुळे व सरकारी , महसुल अधिकारी यांनीच प्रसिध्द केलेली असल्याने तोच पुरावा ग्राह्य धरुन आलेल्या अर्जासंबंधीची आवश्यक कागदपत्रे तहसिल कार्यालयातूनच अर्जाला जोडावीत, जेणेकरुन नागरीकांची गैरसोय न होता तात्काळ कुणबी दाखले मिळतील, अशी मागणी कोरेगाव भीमा ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमधील ठरावात माजी सरपंच विजय गव्हाणे पाटील यांनी केली. त्यास राजेंद्र गवदे यांनी अनुमोदनही दिल्यानंतर हा ठराव मंजुर करण्यात आल्याची माहीती सरपंच विक्रम गव्हाणे पाटील यांनी दिली.
यावेळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सविता घावटे, सदस्या शिल्पा फडतरे, वंदना गव्हाणे, मनिषा गव्हाणे, पोलीस पाटील मालन गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी रतन दवणे, पोलीस हवालदार श्री. मोरे, संपत गव्हाणे, मधुकर गव्हाणे, सुनिल भांडवलकर, सुनिल ढेरंगे आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
——————
प्रशासनाची सकारात्मक भुमिका…
याबाबत मंडलाधिकारी श्री.फुके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पुर्वीप्रमाणेच सर्व कागदपत्रांच्या पुराव्यांसह परीपुर्ण अर्ज असल्याशिवाय अर्जच स्विकारता येणार नसल्याचे सांगत, या निकषानुसार या शिबीरात तीन गावांचे मिळून केवळ ३२ परिपुर्ण अर्ज आल्याचे नमुद केले. तसेच ग्रामस्थांच्या मागणीनुसार पुन्हा शिबीर घेण्याबाबत प्रशासनाची सकारात्मक व सहकार्याची भुमिका असल्याचेही सांगितले.