विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम स्थळी वरीष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
पेरणे फाटा येथे येत्या १ जानेवारी रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीची केली पाहणी
पुणे : कोरेगाव भीमा नजिक पेरणे फाटा येथे येत्या १ जानेवारी रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या निर्देशानुसार प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पेरणेफाटा (ता. हवेली) येथील कार्यक्रम स्थळाची पाहणी केली तसेच सध्या येथे करण्यात येत असलेल्या पूर्वतयारीचाही आढावा घेतला.
या भेटीच्या वेळी अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले, हवेलीचे गटविकास अधिकारी भुषण जोशी आदींसह विविध कार्यान्वयीन यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पेरणेफाटा येथे १ जानेवारी रोजी विजयस्तंभास अभिवादन करण्यास येणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, विद्युत प्रकाश व्यवस्था, वाहनतळ, सुरक्षा व आरोग्य सोयीसुविधा मिळतील यादृष्टीने सर्व तयारी तसेच गर्दी व वाहतुकीचे नियोजन करण्याविषयीही माहिती घेण्यात आली. यावेळी लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वजित काईंगडे तसेच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद क्षीरसागर हेही आपल्या सहकार्यांसह उपस्थित होते.