केसनंद येथे तळेरानवाडीत फ्लॅटमध्ये आग लागून साहित्य जळाले
स्थानिक कार्यकर्त्यांच्या तत्पर मदत कार्यवाहीमुळे मोठा धोका टळला.
पुणे : केसनंद, तळेरानवाडी येथे ऑप्टीमा हौसिंग सोसायटी मधील एका फ्लॅटमध्ये सायंकाळच्या सुमारास आग लागून आतील साहीत्य जळाले. मात्र सुदैवाने या आगीत कोणालाही इजा झाली नाही. तसेच तळेरानवाडी येथील कार्यकर्त्यांनी वेळीच कार्यवाही करीत अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवल्याने पुढील मोठा धोका टळला.
थेऊर रस्त्यावर तळेरानवाडी येथे ऑप्टीमा हौसिंग सोसायटी मधील फ्लॅटमध्ये दुपारी साडेचारच्या सुमारास लागलेल्या आगीमुळे खिडकीतून धूर येऊ लागल्याने परिसरातील नागरीक आग विझवण्यासाठी धावले. तसेच अग्निशमन दलालाही कळवण्यात आले.
दरम्यानच्या काळात विकी हरगुडे, विक्रम हरगुडे, प्रशांत हरगुडे, मयुर हरगुडे, ऋषी कावरे, प्रणील धुमाळ आदिंसह अनेक कार्यकर्त्यांनी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या दरम्यान अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी पोहोचले. सामूहिक प्रयत्नाने आग नियंत्रणात आणण्यात आली. मात्र आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. तळेरानवाडी परिसरातील कार्यकर्त्यांनी आग विझवण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.