भामा आसखेड पुनवर्सनाचे शेरे काढण्याबाबत महसूल प्रशासनाकडून अखेर लेखी आश्वासन, पै.संदीप भोंडवे यांचे उपोषण सोडले.
पूर्व हवेलीच्या अप्पर तहसीलदार सौ.तृप्ती कोलते यांनी कार्यआंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांना लेखी आश्वासन देत आमरण उपोषण सोडण्यात आले.
पुणे: भामा आसखेड पुनवर्सनाचे शेरे काढण्याच्या कार्यवाहीबाबत पेरणेफाटा येथे भामा आसखेड जमीन संपादन विरोधी कृती समितीचे अध्यक्ष पै. संदीपआप्पा भोंडवे यांनी शेतकऱ्यांसह मंगळवारपासून सुरू केलेले आमरण उपोषण आज पूर्व हवेलीच्या अप्पर तहसीलदार सौ.तृप्ती कोलते यांनी कार्यआंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांना लेखी आश्वासन दिल्याने अखेर आमरण उपोषण सोडण्यात आले.
भामा आसखेडचे पुनवर्सनाचे शेरे काढावेत, तसेच पूर्व हवेलीत गुंठेवारी नोंदी प्रश्नी महसूल प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेविरोधात पेरणेफाटा येथे भामा आसखेड जमीन संपादन विरोधी कृती समितीचे अध्यक्ष पै. संदीपआप्पा भोंडवे यांनी शेतकऱ्यांसह मंगळवारपासून आमरण उपोषण सुरू होते.
काल जिल्हा प्रशासनाकडून या आंदोलनाची दखल घेऊन प्रांताधिकारी संजय आसवले तसेच अप्पर तहसिलदार तृप्ती कोलते यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. तसेच याबाबत कार्यवाहीची ग्वाही दिली. दरम्यान त्वरीत ठोस कार्यवाहीबाबत लेखी आश्वासनाचा आग्रह धरल्याने भोंडवे यांचेसह शेतकऱ्यांनी उपोषण सुरूच ठेवले.
दरम्यान आज सायंकाळी पूर्व हवेलीच्या अप्पर तहसीलदार सौ.तृप्ती कोलते तसेच मंडल अधिकारी संदीप झिगाडे, पेरणेचे तलाठी संजय शितोळे, लोणीकंदचे तलाठी गणेश सासणे आदीनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांना पंधरा दिवसात कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर कृती समितीचे अध्यक्ष पै. संदीपआप्पा भोंडवे यांनी उपोषण सोडले. यावेळी पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.