‘शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ज्ञानेश्वर कटके यांच्यावर शिरूर-हवेली विधानसभा समन्वयक पदाची जबाबदारी, मतदार संघात कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त.

शिरूर-हवेली विधानसभेच्या उमेदवारीचा सकारात्मक संदेश मिळाल्याचा कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त

पुणे : आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर उद्धव ठाकरे गटाकडून शिरूर-हवेली विधानसभा निवडणूक समन्वयक पदाची जबाबदारी शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्यावर सोपविण्यात आली आहे. दरम्यान या नव्या जबाबदारीमुळे पक्षाकडून कटके यांच्या शिरूर-हवेली विधानसभेच्या उमेदवारीचा सकारात्मक संदेशही मिळाल्याचा आनंद मतदार संघातील कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

       मुुंबई येथील बैठकीत लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी संघटनात्मक बांधणी आणि नवी रचना करीत शिवसेना ठाकरे गटाचे विभागीय नेते जाहीर करण्यात आले. यात उत्तर महाराष्ट्रासह पुणे, बारामती, शिरूर व मावळचीही जबाबदारी खासदार संजय राऊत यांच्यावर सोपविण्यात आली.  त्यानंतर खासदार राऊत तसेच माजी राज्यमंत्री तथा संपर्क प्रमुख सचिन आहेर यांनी शिरूर-हवेली विधानसभा समन्वयक पदासाठी ज्ञानेश्वर कटके यांचे नाव सुचविले. यावर उपस्थितांनी एकमताने त्यास सहमती दर्शविली. 

     पुणे जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके हे खासदार संजय राऊत तसेच सचिन आहेर यांच्या जवळचे आणि विश्‍वासू सहकारी मानले जातात. यामुळेच उत्तर महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्याची जबाबदारी स्विकारत असताना संजय राऊत यांनी शिरूर-हवेली विधानसभा समन्वयक पदाची जबाबदारी कटके यांच्यावर सोपविली आहे.

       शिवसेनेचे युवा नेतृत्त्व अशी ओळख असलेल्या कटके यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिरूर-हवेलीत अनेक कामांना चालना दिली असून तळागळातील कार्यकर्त्यांशीही त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे आगामी विधानसभेसाठीही शिवसेनेकडून कटके यांचे नाव उमेदवारीसाठी घेतले जाते. त्यातच आता त्यांच्यावर विधानसभा मतदार संघाचीही मोठी जबाबदारी सोपविण्यात आल्यामुळे कटके यांच्या उमेदवारीला बळ मिळणार आहे.

——————– 

पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे तसेच खासदार संजय राऊत यांनी दाखविलेला विश्‍वास आजपर्यंत सार्थ ठरविला आहे. तसेच आगामी निवडणुकीतील यशासाठी शिरूर-हवेली विधानसभा समन्वयक पदाची जबाबदारीही तेवढ्याच सक्षमपणे पेलणार आहे.

ज्ञानेश्वर कटके, शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button