ऐतिहासिक विजयस्तंभाजवळ नगररस्त्यावरील पथदिवे वर्षभर बंदच….

वीजबिलाची जबाबदारी निश्चित करुन पथदिवे वर्षभर सुरु ठेवण्याची मागणी.

पुणे : पेरणेफाटा (ता. हवेली.) येथे विजयस्तंभानजिक नगर रस्त्यावर जिल्हा नियोजन समितीकडून लाखो रुपये खर्चुन उभारलेले मात्र वीजबिलाअभावी वर्षभर बंद असलेले पथदिवे कधी सुरु होणार ? असा सवाल नागरीकांकडून होत आहे.

          ऐतिहासिक विजयस्तंभ परिसररात दोन वर्षांपुर्वी शासकीय पातळीवर विकास तसेच सुशोभीकरण करण्यात येत असताना विजयस्तंभ समोर हमरस्त्यावर दुभाजकावर विद्युत दिवे बसवण्यात आले. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ८५ लाख रुपये खर्चून विजयस्तंभ चौक ते आळंदी फाटा या जानेवारी दोन किलोमीटरच्या अंतरात महामार्गाच्या मध्यभागी सुमारे ११८ पथदिवे उभारण्यात आले होते. मात्र वीजबिलाची जबाबदारी निश्चित न झाल्यामुळे आठवडाभरातच विजयस्तंभ परिसरातील हे पथदिवे बंद झाले. त्यामुळे हा परिसर पुन्हा वर्षभर अंधारातच आहे. लाखो रुपये खर्चून जर उद्देशच साध्य झाला नसेल, तर तो निधी पाण्यात गेल्यासारखेच आहे, असा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत. 

         कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे २०१८ मध्ये झालेल्या दंगलीनंतर शासनाकडून विजयस्तंभ परिसरात २४ तास पोलिस बंदोबस्त तसेच विजयस्तंभा समोर पुणे नगर महामार्गावरही उजेड राहण्यासाठी रस्त्याच्या दुभाजकावर पथदिवेही बसवले. मात्र रस्त्यावरील हे दिवे वर्षभर बंदच असल्याने येथील हमरस्त्यावर अंधारच असतो. या परिसरात रोजच राज्यभरातून येणाऱ्या नागरीकांची तसेच वाहनांचीही वर्दळ असताना हे दिवे बंद असल्यामुळे सर्वांचीच मोठी गैरसोय होते.  

         सध्या येत्या एक जानेवारीचा शौर्यदिन कार्यक्रम जवळ आलेला असताना बंद असलेले हे पथदिवे प्रशासनाने तत्काळ सुरु करावेत. अशी मागणी कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे, 

———–

विजयस्तंभ समोरील रस्त्याच्या दुभाजकावर असलेले सर्व दिवे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने लावण्यात आलेले आहे, मात्र ग्रामपंचायतचे उत्पन्न कमी असल्याने ग्रामपंचायत त्या पथदिव्यांचे वीजबिल भरू शकत नसल्याने बार्टीच्या वतीने त्याची देखभाल व इतर खर्च करावा, असा पत्रव्यवहार ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आला आहे. 

———–

के. एल. थोरात, ग्रामविकास अधिकारी, पेरणे

———–

शौर्यदिनाच्या पार्श्वभुमीवर पथदिवे तातडीने सुरू करा : सर्जेराव वाघमारे.

———–

विजयस्तंभासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाने बसवलेले दिवे वर्षभर बंद असल्याने येथे येणाऱ्या समाजबांधवांची तसेच स्थानिक नागरीकांची गैरसोय होत आहे. शौर्यदिनाचा कार्यक्रम जवळ आलेला असताना शासनाच्या संबंधित विभागाने कायमस्वरुपी वीजबिलाबाबत योग्य ती कार्यवाही करुन बंद असलेले हे पथदिवे तत्काळ सुरु करावेत.

———–

सर्जेराव वाघमारे, अध्यक्ष, कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा समिती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button