महाराष्ट्र केसरी गटातून संभाव्य विजेत्या सिंकदर शेख, शिवराज राक्षेची आगेकूच, तर सिंकदर शेखचा विशाल बनकरला नमवत उपांत्य फेरीत प्रवेश
६६ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा :
पुणे, ता. ८ : महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धेतील प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी गटातून संभाव्य विजेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या शिवराज राक्षेने गादी, तर सिंकदर शेखने माती विभागातून आपली आगेकूच कायम राखत पाचव्या फेरीत प्रवेश केला आहे. या दोघांच्याही लढतीची सर्वांनाच उत्कंठा आहे. तर सिंकदर शेखने सोलापूरच्या विशाल बनकरला नमवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
फुलगाव येथे सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या मैदानावर जिल्हा बँक संचालक प्रदीपदादा कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ तसेच महाराष्ट्र प्रदेश क्रिडा आघाडीचे अध्यक्ष पै. संदीपआप्पा भोंडवे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ६६ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरु आहे.काल सायंकाळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या हस्ते व आंतरराष्ट्रीय मल्ल, हिंदकेसरी व महाराष्ट्र केसरी विजेत्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ झाला.
आज स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी गादी विभागातील लढतीत शिवराजने कमालीचा आक्रमक पवित्रा घेत जयसिंगला तांत्रिक आघाडीवर १०-० असे पराभूत केले. पहिल्या १० सेकंदातच दोन गुणांची कमाई करताना त्याने आपले मनसुबे स्पष्ट केले. त्यानंतर दुहेरी पट आणि भारंदाज डावाचा वापर करून आपली आघाडी झटपट वाढवत जयसिंगला प्रतिकाराची संधीच दिली नाही.
तर सिंकदरने देखील आपला वेगवान आणि चपळ कुस्ती खेळण्याचा लौकिक कायम राखताना धुळ्याच्या रितीक राजपूतचे आव्हान अगदी सहज परतवून लावले. बगलडुप डावाने सुरुवात करताना सिंकदरने नंतर भारंदाज आणि दुहेरी, तसेच एकेरी पटाचेही डाव खेळत झटपट गुणांची वसूली केली.
सिंकदर शेखचा सोलापूरच्या विशाल बनकरला नमवत उपांत्य फेरीत प्रवेश
सिंकदर शेखने महाराष्ट्र केसरी गटातून आपली आगेकूच कायम राखताना सोलापूरच्या विशाल बनकरचे तगडे आव्हान ९-८ असे एका गुणाने मोडून काढत माती विभागातून अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्या फेरीत विशालचा ताबा मिळवत भारंदाज डावावर प्रत्येकी दोन गुण मिळवत सिकंदरने ४ गुणांची कमाई केली. विशालनेही दोन गुण मिळवत चुरस कायम राखली. अखेरच्या तीन मिनिटांच्या फेरीत सिंकदरचा चपळपणा पुन्हा एकदा निर्णायक ठरला. प्रथम कुस्ती आखाड्या बाहेर नेत त्याने एका गुणांची कमाई केली.
विशालनेही तशीच कृती करून एक गुण मिळवला. मात्र, त्यानंतर विशालने एकत्रित चार गुणांची कमाई करताना ७-७ अशी चुरस निर्माण केली. मात्र, सिंकदरने वेळीच सावध राहताना विशालवर ताबा मिळवून दोन गुणांची कमाई करताना आघाडी मिळवली आणि ती कायम राखत विजय मिळविला.
या गटातील अन्य लढतीत साताऱ्याच्या तुषार ठोंबरेने मुंबईच्या बालाजी मेटकर, तर मुंबई शहरच्या विक्रम भोसलेने ठाण्याच्या प्रशांत शिंदेचा पराभव करून माती विभागातून आगेकूच कायम राखली. दरम्यान, गादी विभागातील ५७ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीच्या लढतीत बीडच्या आतिश तोडकरने आपला लौकिक कायम राखताना आणखी एक लढत एकतर्फी जिंकत वर्चस्व राखले. आतिशने ५७ किलो वजनी गटात गादी विभागातून अंतिम फेरी गाठताना ओंकार शिर्केचा तांत्रिक १०-० अशा आघाडीवर पराभव केला.
विजेतेपदासाठी त्याचा सामना आता सोलापूरच्या आकाश सरगरशी होणार आहे. आकाशने पहिल्या फेरीतच पिंपरी चिंचवडच्या प्रणव सस्तेवर ६-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीसाठी प्रणव मॅटवर आलाच नाही. त्यामुळे आकाशला विजयी घोषित करण्यात आले.
स्पर्धेतील ७४ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत पुण्याच्या अनिल कचरेने जालन्याच्या पवन बावणेचा १३-३, तर गडचिरोलीच्या संदेश शिपमुळेने कोल्हापूरच्या आकाश कपडेचा ७-१ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
माती विभागातील ५७ किलो वजनी गटात कृष्णा हरणावळने अंतिम फेरी गाठताना साताऱ्याच्या विशाल रुपनरचा १८-८ आणि सोलापूरच्या सौरभ इगवेने पुणे शहरच्या अभिजित शेडगेचा १०-० असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. अंकुश माने (७९ किलो), लखन म्हात्रे (७९ किलो), सुदर्शन पाटील (९२ किलो), राम धायगुडे (८६ किलो), सचिन दाताळ (६५ किलो) यांनी आपल्या मोहिमेस विजयी सुरुवात केली.