फुलगावात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन संपन्न
महाराष्ट्रातील मल्लांनी ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न पहावे - खासदार रामदास तडस
पुणे, : फुलगाव (ता. हवेली) येथे ६६ व्या वरीष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतीचा शुभारंभ आज सायंकाळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस तसेच आंतरराष्ट्रीय मल्ल, हिंदकेसरी व महाराष्ट्र केसरी विजेत्यांच्या उपस्थितीत झाला. उद्धाटनप्रसंगी पै. अनिकेत मांगडे व पै. पृथ्वीराज मोहोळच्या विजयी सलामीचाही कुस्तीप्रेमींनी आनंद घेतला.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ६६ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा फुलगाव येथील सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या मैदानावर सुरु आहे.
स्पर्धेच्या उद्धाटनप्रसंगी खासदार रामदास तडस यांच्यासह स्वागताध्यक्ष व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सदस्य प्रदीप कंद, कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पै.विलास कथुरे, ऑलंपियन पै. नरसिंग यादव, हिंदकेसरी पै.योगेश दोडके, भारत केसरी पै.विजय गावडे, आशियाई सुवर्ण विजेते पै. रविंद्र पाटील, महाराष्ट्र केसरी बापुसाहेब लोखंडे, महाराष्ट्र केसरी अभिजित कटके, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, महाराष्ट्र केसरी पै.सईद चाऊस, मुंबई महापौर केसरी आबा काळे, उपमहाराष्ट्र केसरी – रवींद्र पाटील आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उद्धाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस म्हणाले. ‘आजपर्यंत महाराष्ट्रात अनेक स्पर्धा झाल्या. महाराष्ट्र केसरीची देखील मैदाने रंगली. पण, कुणीही मोठे स्वप्न पाहिले नाही. आम्ही आता हे स्वप्न बघत आहोत. महाराष्ट्राच्या मल्लांनी ऑलिम्पिकमध्ये खेळावे असे आमचे स्वप्न आहे आणि ते सत्यात उतरविण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही आखाड्यात झुंज द्या, तुम्हाला काही कमी पडणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, असे आश्वासनही खासदार तडस यांनी दिले.
तर महाराष्ट्राच्या मल्लांनी आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत खेळावे, यासाठी त्यांना अधिकाअधिक सराव मिळून देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन यापुढील काळात करण्यात येईल, असे सांगून महाराष्ट्रातील मल्लांना आशियाई, राष्ट्रकुल स्पर्धेसारखे मोठे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्यास त्यांची कामगिरी अधिक चांगली होईल, असाही विश्वासही यावेळी खासदार तडस यांनी व्यक्त केला.
तसेच खेळाडूंना नोकरी देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करताना तडस यांनी सरकारने कुस्तीपटूंना नोकरी देताना त्यांच्यात जिद्द निर्माण व्हावी, याकरीता त्यांच्यासमोर आशियाई, राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळविण्याचीही अट टाकल्यास ते चांगली मेहनत करून प्रतिस्पर्ध्यांसमोर आव्हान उभे करतील, असा विश्वासही व्यक्त केला.
स्पर्धेचे आयोजक व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद व महाराष्ट्र प्रदेश क्रीडा आघाडीचे अध्यक्ष व महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे सदस्य पै संदीपआप्पा भोंडवे तसेच भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोहिदास उंदरे पाटील तसेच भाजपा हवेली तालुकाध्यक्ष शामराव गावडे आदींसह पदाधिकाऱ्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे दिमाखदार आयोजन तसेच कुस्तीच्या लढती पाहण्यासाठी पंचक्रोशीसह राज्यभरातून कुस्तीशौकीनांनी मोठी गर्दी केली होती.
फुलगाव येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ संलग्न ४१ जिल्हा कुस्तीगीर संघ सहभागी झाले आहेत. काल ५७ किलो, ७४ किलो व महाराष्ट्र केसरी गादी व माती विभागातील वजने झाली. तसेच आज सकाळी आठ वाजल्यापासूनच कुस्ती स्पर्धेस प्रारंभ झाला. तर महाराष्ट्र केसरी विभागातील कुस्त्या संध्याकाळच्या सत्रातच होत आहेत.
विशेष करुन महाराष्ट्र केसरी गादी विभागामध्ये गतवेळचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, पै. हर्षद कोकाटे, पै. कालीचरण सोलनकर, पै. सुदर्शन कोतकर, पै.राजेंद्र सुळ, पै.निलेश लोखंडे, पै. अक्षय गरुड, पै. अक्षय कावरे आदींसह एकुण ३७ मल्ल सहभागी झाले आहेत. तर महाराष्ट्र केसरी माती विभागात पै. सिंकदर शेख, पै. वेताळ शेळके, पै. विशाल बनकर, पै. पृथ्वीराज मोहोळ, पै. सतीष मुंढे, पै. अनिकेत मांगडे, पै. समिर शेख यांच्यासह एकुण ३८ मल्ल सहभागी झाले आहेत.
————-
महाराष्ट्र केसरी गटात झालेल्या माती विभागातील पहिल्या लढतीत यजमान पुणे शहरच्या अनिकेत मांगडेने अमरावतीच्या तानाजी झुंजुरकेचे तगडे आव्हान १२-१० असे परतवून लावत शानदार सलामी दिली. डाव आणि प्रतिडावाच्या पहिल्या फेरीनंतर विश्रांतीला सामना ६-६ असा बरोबरीत राहिला होता. पहिल्या फेरीतील हा वेग दुसऱ्या फेरीत कायम राहिला नाही. चुरस जरूर झाली. पण, बचावावर भर देत दोघांनीही एकमेकांना मैदानाबाहेर काढण्यावरच भर देत गुणांची कमाई केली. या चढाओढीत अनिकेतने बाजी मारली.
केसरी गटात पहिल्याच दिवशी गोंदियाच्या वेताळ शेळकेने सोलापूरच्या विशाल बनकरला पुढे चाल दिली. नाव आणि वजन देऊनही वेताळने मातीच्या आखाड्यावर उपस्थिती लावली नाही. अन्य एका लढतीत पृथ्वीराजने आक्रमक आणि वेगवान कुस्ती करताना भारंदाज डावाचा मुक्त वापर करत शुभम जाधवला तांत्रिक आघाडीवर १०-० असे पराभूत केले.
दरम्यान, राज्य अजिंक्यपद स्पर्धेत माती विभागातील ५७ किलो वजनी गाटत साताऱ्याच्या ओंकार शिर्केने कमालीची आक्रमकता राखत नंदुरबारच्या निखिल पवारचा तांत्रिक वर्चस्वावर १०-० असा पराभव केला. दुसऱ्या लढतीत यवतमाळच्या विनायक चव्हाणने जालनाच्या प्रदिप पवारचे आव्हान ८-७ असे एका गुणाने परतवून लावले.
कोल्हापूरच्या रोहित पाटिलने निर्विवाद वर्चस्व राखताना ज्ञानेश्वर माळीचा १०-० असा पराभव केला. बीडच्या अतिश तोडकरने धाराशिवच्या धवलसिंह चव्हाणला अशाच १०-० अशा फरकाने पराभूत केले. कोल्हापूरच्या ओंकार पाटीलने रायगडच्या साहिल शेखचा प्रतिकार १९-१४ असा मोडून काढला. पिंपरी चिंचवडच्या प्रणव सस्तेने अभिजीतचा गुणांवरच १८-८ असा पराभव करून आपली आगेकूच कायम राखली. याच वजनी गटातून आकाश सरगर आणि सांगलीच्या निनाद बडरे यांनीही आपले आव्हान कायम राखले.
याचवेळी गादी विभागातून ७४ किलो वजनी गटात शुभम थोरात,अतुल नायकळ, करण फुलमाळी, वैजनाथ पाटील, स्वप्नील गुट्ट, अक्षय हिरगुडे, राकेश तांबुलकर, स्वस्तिक वाकडे यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
अन्य निकाल पुढीलप्रमाणे : महाराष्ट्र केसरी (माती)- गोपाळ जाणे (जळगाव) वि.वि. सय्यद अफरोज (नांदेड) ११-०, सुरज मुंडे (बीड) वि.वि. भगवान बाबर (जालना) १०-०, असे आहेत.