महाराष्ट्राच्या मल्लांनी मोठी स्वप्ने बघावीत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
फुलगाव - ६६ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा
पुणे : कुस्ती ही महाराष्ट्राची परंपरा आणि ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा महाराष्ट्राचे वैभव आहे. या दोन्हीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पण, महाराष्ट्र केसरी विजेता मल्ल राज्यातच अडकलेला दिसून येतोय. त्यांनी राज्यात अडकून न राहता मोठी स्वप्ने बघायला हवीत. आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची त्यांची क्षमता आहे, ती त्यांनी सिद्ध करावी, असे आवाहन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
फुलगाव येथे सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या मैदानावर जिल्हा बँक संचालक प्रदीपदादा कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ तसेच महाराष्ट्र प्रदेश क्रिडा आघाडीचे अध्यक्ष पै. संदीपआप्पा भोंडवे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ६६ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरु आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आज तिसऱ्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पर्धेला भेट दिली. महाराष्ट्र केसरी गादी व माती विभागातील अंतिम कुस्त्या त्यांच्या उपस्थितीत लावण्यात आल्या. यावेळी मानाची गदा देवून फडणवीस यांचा सन्मान करण्यात आला. तर पै, राहुल साकोरे यांनीही फुलगाव ग्रामस्थांच्या वतीने फडणवीस यांचा सन्मान केला.
याप्रसंगी खासदार रामदास तडस, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, भीमराव तापकीर, दिपक पायगुडे, बाळा भेगडे, बापुसाहेब पठारे, आयोजक प्रदिप कंद, संदीप भोंडवे, रोहीदास उंद्रे, धर्मेद्र खांडरे, राहुल पाचर्णे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस पै. योगेश दोडके व पै.विलास कथुरे, प्रकाश जगताप, सुभाष जगताप, आबासाहेब सोनावणे, शामराव गावडे, किरण साकोरे आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, महाराष्ट्राचा पैलवान पदक प्राप्त करेल, अशी सगळेजण वाट पाहत असतात. मागील वर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेपासून पैलवानांचे मानधन वाढवले आहे. मागील महाराष्ट्र केसरी पासून पैलवानांच्या खुराकाचा खर्च देखील वाढवला आहे. मल्लांच्या साधनांसाठी देखील अनेक योजना आहेत. राज्याचे सरकार मल्लांच्या मागे उभे आहे. मल्लांसाठी ज्या सोयी आवश्यक आहेत त्या आम्ही त्यांना देऊ. पण, मल्लांनी केसरी किताबात न अडकता आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावे इतकीच आमची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र केसरी किताबाचा अधिकार आमचाच – खासदार रामदास तडस
तर प्रास्ताविकात राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष, खासदार रामदास तडस यांनी महाराष्ट्र केसरी किताबाचा अधिकार आमचाच असल्याचे सांगितले. यावेळी ते म्हणाले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने सध्या सुरु असलेल्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा रोखण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. आयोजकांना महाराष्ट्र केसरी हे नाव वापरण्याची परवानगी देऊ नये, असेही परिषदेने याचिकेत म्हटले होते. मात्र, तीन दिवसाच्या चौकशी नंतर न्यायालयाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या बाजूने निर्णय देताना सध्या सुरु असलेल्या स्पर्धेस आणि महाराष्ट्र केसरी हे शिर्षकही वापरण्यास परवानगी दिल्याची माहिती या वेळी राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी दिली.
तर सरकारने कुस्तीला आश्वासक पाठबळ दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत स्वागताध्यक्ष प्रदिपदादा कंद यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर पै. संदीपआप्पा भोंडवे यांनी आभार मानले.