पूर्व हवेलीसाठी लोणी काळभोर येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय, शासनाचा अध्यादेश जारी

आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नांना यश

पुणे : हवेली तालुक्याचा विस्तार तसेच महसुली कामाचा ताण लक्षात घेऊन पूर्व हवेलीला स्वतंत्र तहसिलदार देण्याबाबत शिरूर – हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार यांच्या मागणीस यश आले असून पूर्व हवेलीसाठी लोणी काळभोर येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय मंजुरीचा शासकीय अध्यादेश आज जारी करण्यात आला.

सध्या हवेली तहसील कार्यालय पुणे शहरात असल्याने नागरिकांचा तेथील कामासाठी ये-जा करताना पूर्ण दिवस जातो. तसेच हवेली तहसिल कार्यालयावर येणारा ताण व पूर्व हवेलीतील नागरिकांना कामकाजासाठी शहरात ये-जा करण्यासाठी होणारा त्रास वाचावा, यासाठी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी पूर्व हवेलीत मध्यवर्ती ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याची मागणी शासनाकडे सातत्याने लावून धरली होती.

त्यानुसार हवेली तालुक्याचा भौगोलिकदृष्ट्या मोठा विस्तार तसेच वाढते शहरीकरण व वाढत्या प्रशासकीय कामकाजामुळे प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पूर्वहवेलीतील लोणी काळभोर येथे स्वतंत्र अपर तहसील कार्यालय स्थापन करुन त्याकरीता आवश्यक पदांची निर्मिती करण्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन होता.

अखेर हवेलीत लोणी काळभोर येथे अपर तहसील कार्यालय स्थापन करणे व त्याअनुषंगाने आवश्यक पद मंजुरीस व अन्य अनुषंगिक बाबीस आजच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आल्याने आमदार अशोक पवार यांच्या मागणीस यश आले होते.

या नवीन कार्यालयासाठी अपर तहसीलदार व महसूल सहायक (लिपिक-टंकलेखक) अशी दोन पदेही नियमित वेतनश्रेणीवर मंजुर करण्यास शासन मान्यता देण्यात आली.

या कार्यालयाअंतर्गत वाघोली, उरळीकांचन, थेऊर मंडलातील ४४ गावांचे कामकाज पाहीले जाणार आहे. तर पश्चिम हवेलीतील उर्वरित खडकवासला, कोथरूड हडपसर, खेड शिवापुर व कळस, पाच महसुली मंडळातील ८६ गावांचे कामकाज हवेली तहसील कार्यातूनच चालणार आहे.

दरम्यान आमदार अशोक पवार यांच्या पुढाकारातून वढू तुळापूरला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ऐतिहासिक स्मारकाचा विकास आराखडा मंजुरी तसेच पूर्व हवेलीला स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालयासारख्या विविध मोठ्या विकासकामांमुळे शिरूर हवेलीचा चेहरा मोहरा बदलणार आहे.

तसेच भौगोलिक दृष्ट्या मोठा विस्तार असलेल्या हवेली तालुक्याच्या तहसिल कार्यालयावर येणारा महसुली कामकाजाचा ताण कमी होवून पूर्व हवेलीतील नागरिकांना वेगवान कामकाज तसेच कामासाठी ये-जा करताना होणारा त्रासही वाचावा, या दुहेरी हेतूने शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून पूर्व हवेलीतील नागरिकांची महसुली कामे आता शहरात न जाता स्थानिक पातळीवरच मार्गी लागून जनतेला दिलासा मिळणार आहे.

अँड. अशोक पवार , आमदार, शिरूर हवेली.

……

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button