दशकभर शासनदरबारी पाठपुरावा करुनही स्मशानभूमीसाठी जागा ताब्यात न मिळाल्याने अखेर बुर्केगावात तीन ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे बुधवारपासून आमरण उपोषण आंदाेलन
भुमिअभिलेख विभागाने स्मशानभूमीची जागा तातडीने मोजुन ताब्यात देण्याची ग्रामस्थांची शासनाकडे मागणी
पुणे : बुर्केगाव (ता. हवेली) येथे स्मशानभूमीच्या जागेसाठी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करुनही प्रश्न न सुटल्याने अखेर तीन ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी स्मशानभूमीसाठी तीन गुंठे जागेच्या ताब्यासाठी आमरण उपोषण आंदोलन सुरु केले आहे. मात्र आज तिसऱ्या दिवशीही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही झालेली नसल्याने आंदोलक व ग्रामस्थ संतप्त आहेत.
बुर्केगावात शासनाकडून हद्दनिश्चतीअभावी गावच्या स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न प्रलंबित आहे. सरकार दरबारी चौकशी, नोटीस, मोजणी, सुनावणीच्या फेऱ्यांत अडकलेल्या या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी येथील ग्रामस्थ गेली दशकभराहून अधिक काळ हेलपाटे मारत आहेत.
ग्रामपंचायतीने शासनाकडे केलेल्या पत्रव्यवहारानुसार, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने भीमा नदीलगत तीन आर क्षेत्र स्मशानभूमीसाठी राखीव क्षेत्र असल्याची नोंद फेरफारमध्ये करण्यात आली. मात्र याच गटात असलेल्या खाजगी मालकीच्या क्षेत्रामुळे स्मशानभूमीसाठी दिलेली जागा निश्चित होऊ शकली नाही.
त्यामुळे स्मशानभुमीसाठी आलेला निधीही परत गेल्याने स्मशानभुमीचे कामही होवू शकलेले नाही. तर संबंधित जागेची मोजणी व हद्दनिश्चीती करण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी भुमिअभिलेख खात्यांशी पत्रव्यवहार करुनही भुमिअभिलेख विभागाने त्यावर अद्यापही ठोस निर्णय दिलेला नाही.
त्यामुळे याप्रश्नी ठोस तोडगा काढण्यासाठी अखेर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ. वर्षा सोमनाथ गुंड, निर्मला बिरदेव ठोंबरे व अजिंक्य विनायक यनभर या तीन ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी स्मशानभुमीसाठी शासनाने गट नं. १ च्या लगत उत्तरेस आरक्षित असलेली तीन गुंठे जागा मोजणी करुन त्वरीत ताबा द्यावा, या मागणीसाठी बुर्केगावात उपोषण आंदोलन सुरू केले आहे.
मात्र शासनदरबारी पाठपुरावा करुन अजुनही न सुटलेला हा प्रश्न मार्गी तरी कधी लागणार ? असा संतप्त सवाल आंदोलनकर्ते सौ. वर्षा सोमनाथ गुंड, निर्मला बिरदेव ठोंबरे व अजिंक्य विनायक यनभर या तीन ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी केला आहे. तर पावसाळ्यात सर्वत्र चिखलपाणी झाल्यास अंत्यसंस्कार कुठे करायचे ? असाही प्रश्न ग्रामस्थ व नातेवाईकांना सतावत असतो.