अष्टापूर येथील बिबट हल्ल्यातील जखमी महिलेस वन विभागाकडून पाच लाखांची मदत
शिरूर-हवेलीचे आमदार माऊली कटके यांच्या पाठपुराव्यानंतर वनविभागाकडून तत्काळ कार्यवाही

पुणे : पूर्व हवेलीतील अष्टापूर येथे बिबट हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला शिरूर-हवेलीचे आमदार माऊली कटके यांच्या पाठपुराव्यानंतर वन विभागाकडून उपचार तसेच पाच लाखांची मदत देण्यात आली.
शिरूर-हवेलीतील अनेक गावांमध्ये सध्या पाळीव प्राण्यांबरोबरच मानवी हल्लेही वाढल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यातच नऊ डिसेंबर रोजी सकाळी आष्टापूर (ता. हवेली) येथेही अंजना वाल्मीक कोतवाल या महिलेवर बिबट्याचा हल्ला झाल्याने शिरूर-हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी वनविभाग प्रशासनाला धारेवर धरले होते.
बिबट्यांच्या मानवी वस्तीत वाढता वावर तसेच शिरूर हवेलीतील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आमदार माऊली कटके यांनी सभागृहात याबाबत लक्षवेधी सूचनेद्वारे आवाज उठवत ठोस उपाय योजनेचीही मागणी केली. तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनाही फोन करून जखमी महिलेला उपचार व मदत तसेच या परिसरातील बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी तातडीने ठोस उपाय योजना करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. यामध्ये आवश्यक तेथे ताबडतोब पिंजरे वाढवून ट्रॅकिंग कॅमेरे तसेच सर्चिंग ड्रोन द्वारे बिबट्यांचा शोध घेण्याबाबतही सूचना दिलेल्या आहेत.
दरम्यान आमदार माऊली कटके यांनी सभागृहात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर वनमंत्र्यांनीही कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर वनविभाग प्रशासनाने जखमी महिलेला उपचार व मदत करण्यासाठी वेगवान कार्यवाही करण्यात आली.
शासननिर्णयाप्रमाणे वन्यप्राण्याच्या हल्यात मनुष्य गंभीर जखमी झाल्यास पाच लक्ष रुपये नुकसान भरपाई देणेबाबत असलेल्या तरतुदीच्या अनुषंगाने सौ. अंजना वाल्मिक कोतवाल, (वय ५० वर्ष, रा. मौजे आष्टापूर, ता. हवेली, जिल्हा पुणे) यांना पाच लाख रुपयांच्या अर्थसहाय्याचा धनादेश वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांच्या माध्यमातून नुकताच आमदार माऊली कटके यांच्या हस्ते अंजना कोतवाल यांना देण्यात आला. याप्रसंगी यशवंत साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप तसेच अन्य पदाधिकारी व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
………



