लोणीकंद चौक व नगर रस्ता रुंदीकरणाची आठवडे भरात कारवाईची प्रशासनाची ग्वाही
लोणीकंद येथे ज्येष्ठ नागरीकांचे लाक्षणिक उपोषण अखेर स्थगित
पुणे : पुणे – नगर रस्त्यावर लोणीकंद हद्दीत सातत्याने येथे वाहतुक कोंडी होणार्या तुळापूर फाटा चौक व लोणीकंद-थेऊर बायपास या दोन्ही चौकांचे विस्तारीकरण तसेच लोणीकंद हद्दीतील चौपदरी हमरस्त्याचे सहापदरी विस्तारीकरणाची कामे आठवडे भरात पुर्ण करण्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम खात्याने दिल्याने अखेर ज्येष्ठ नागरीकांचे उपोषण स्थगित करण्यात आले.
लोणीकंद हद्दीत थेऊर चौक व नगर रस्ता रुंदीकरणासाठी अनेक वेळा पाठपुरावा करूनही कार्यवाही न झाल्यामुळे या प्रश्नी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संत व समाजसुधारक विचारांचे प्रचार प्रसार प्रबोधन केंद्र, भारतीय किसान संघ तसेच ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आज महापरिनिर्वाणदिनी लोणीकंद येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात किसान संघ व प्रबोधन केंद्राचे अध्यक्ष उत्तमराव भोंडवे, माजी उपसभापती नारायणराव कंद, माजी उपसरपंच श्रीमंत झुरुंगे, माजी उपसरपंच संजय कंद, सदाशिव झुरुंगे, किसान संघाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर झुरुंगे, सोसायटीचे माजी अध्यक्ष रघुनाथ कंद, उद्योजक गुलाबराव शिंदे, गाडामालक गुलाबराव कंद आदी उपोषणाला बसले होते.
यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता अरुण कदम, कनिष्ठ अभियंता सलीम तडवी, वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता विजय जाधव, सहाय्यक अभियंता दिपक बाबर या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून या प्रश्नी चर्चा घेतली.तसेच स्थानिकांच्या मदतीने लोणीकंद येथील थेऊर चौक व रस्ता रुंदीकरण करणे तसेच चौकात भुमिगत केबल टाकण्याचे कामही येत्या आठवडे भरातच पुर्ण करण्याचे आश्वासन दिले. तर स्थानिकांनीही याकामी सहकार्य करण्याची तसेच समन्वयाने तोडगा काढून काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक प्रदीपदादा कंद यांच्याशी चर्चा करून रस्ता रुंदीकरणाचे हे काम तातडीने मार्गी लावणार असल्याचे उत्तमराव भोंडवे यांनी सांगितले.
दरम्यान शासकीय अधिकारी तसेच भारतीय किसान संघाचे राज्य कोषाध्यक्ष बबनराव केंजळे, जनसेवा बँकेचे संचालक सुर्यकांत शिर्के यांच्या हस्ते सरबत घेऊन दुपारी उपोषण सोडण्यात आले.यावेळी किसान संघाचे माजी तालुकाध्यक्ष अंकुश कोतवाल,श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे संचालक हनुमंतराव शिवले,भानुदास साकोरे, विलासतात्या खांदवे, बाजार समिती उपसभापती रवीद्र कंद, माजी सरपंच श्रीकांत कंद, माजी उपसरपंच संजय कंद, विद्यमान सरपंच सौ. प्रियांका योगेश झुरुंगे, उपसरपंच राहुलबापू शिंदे, बाळासाहेब मोरे, दशरथ वाळके, साईनाथ वाळके, संतोष झुरूंगे, माऊली ठोंबरे, विक्रम गायकवाड, सुधीर कंद, सागर गायकवाड, रामदास कंद, ज्ञानेश्वर शिवले, शांताराम तापकीर, हरिभाऊ शिवले, माऊली कंद, सोपानराव कंद, बाळासाहेब मेमाने, गजानन कंद, चंद्रकांत मगर, ज्ञानेश्वर कंद, संपतराव कंद, परशुराम कापरे, सुहास ढमाले, दत्तात्रेय जगताप, रवी बाबुराव कंद, विकासराव शिंदे, जयेश कंद, समीर झुरुंगे, शिवसेनेच्या श्रद्धा कदम, अलका सोनवणे, उर्मिला भुजबळ, प्रणाली तांबे, राजेंद्र कंद, चंद्रकांत विधाटे, उत्तम झुरुंगे, काळूराम ठोंबरे, ग्रामविकास अधिकारी श्री. बोरवणे, प्रथमेश आव्हाळे, तलाठी श्री. ससाणे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान पेरणे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या मागणीनुसार पेरणे चौक येथेही रुंदीकरण करण्याची ग्वाही बांधकाम खात्याने दिली.