महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धांचा थरार ७ ते १० नोव्हेंबर दरम्यान फुलगाव सैनिकी शाळेच्या मैदानावर रंगणार
महाराष्ट्र केसरी विजेत्या कुस्तीगीरास थार जीप तर उपमहाराष्ट्र केसरीस ट्रॅक्टर बक्षिस म्हणून मिळणार
पुणे : भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ६६ व्या वरीष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा येत्या ७ ते १० नोव्हेंबर २०२३ दरम्यान फुलगाव येथे संपन्न होत आहेत.
फुलगाव (ता, हवेली, जि. पुणे) येथे नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेच्या तयारीची माहिती नुकतीच स्पर्धेचे आयोजक व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीपदादा कंद व कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदीप भोंडवे यांनी दिली.
या स्पर्धेत ३६ जिल्हा व ६ महानगर पालिका क्षेत्रातील ४२ संघ सहभागी होत आहेत. एका कुस्ती संघात गादी विभागातील १० व माती विभागातील १० असे एकुण २० कुस्तीगीर व २ कुस्ती मार्गदर्शक तर १ संघ व्यवस्थापक असे एकुण २३ जणांचा सहभाग असेल. त्यानुसार ८४० कुस्तीगीर, ८४ कुस्ती मार्गदर्शक व १४२ व्यवस्थापक, ८० पंच व ५० पदाधिकारी अशा एकुण ११०० जणांचा या स्पर्धेत सहभाग असेल.
पंचाचे क्लिनिक, कुस्तीगीरांचे आगमन व वजने व ६ नोव्हेंबरला होणार असुन ७ नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजता कुस्ती स्पर्धेचे उदघाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, उपाध्यक्ष मुरलीधर मोहोळ आदींच्या हस्ते होईल.
तर १० नोव्हेंबरला सायंकाळी सर्व वजनी गटातील अंतिम कुस्त्या व महाराष्ट्र किताबाची कुस्ती होणार असून स्पर्धेचा बक्षिस समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस व अजित पवार यांच्या हस्ते होईल.
महाराष्ट्र केसरी विजेत्या कुस्तीगीरास थार जीप तर उपमहाराष्ट्र होणा-या कुस्तीगीरास ट्रॅक्टर बक्षिस म्हणून मिळणार आहे. तसेच उर्वरीत सर्व वजन गटात प्रथम क्रमांकास स्पेंल्डर दुचाकी, व्दितीय कमांकास रोख २0 हजार व तृतीय क्रमांकास १० हजाराचे बक्षिस मिळणार आहे. या वरीष्ठ राज्य अजिक्यपद कुस्ती स्पर्धेत शासनाच्या वतीने प्रथम क्रमांकास ६० हजार, व्दितीय कमांकास ५५ हजार व तृतीय क्रमांकास ५० हजार रूपयांचे मानधनही दरवर्षी देण्यात येते.
गेल्या ७० वर्षाच्या इतिहासात पुणे जिल्ह्यात नगर रस्त्यावर प्रथमच होणाऱ्या या स्पर्धेसाठी फुलगावातील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत सुमारे ५० हजार प्रेक्षक क्षमतेचे स्टेडीयम उभारण्यात आले असून राज्यभरातून ९०० मल्ल व १०० पंच, १०० कुस्ती मार्गदर्शक, ४५ संघ व्यवस्थापक अशा एकूण १२०० जणांची निवास व भोजन व्यवस्था शाळेचे संस्थापक दिपक पायगुडे यांच्या सहकार्याने करण्यात आल्याची माहितीही स्पर्धेचे स्वागताध्यक्ष व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीपदादा कंद व कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदीप भोंडवे यांनी दिली.
स्पर्धेच्या तयारीची पाहणीही कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष व खासदार रामदास तडस यांनी नुकतीच पदाधिकाऱ्यांसमवेत केली. यावेळी माजी आमदार दीपक पायगुडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक प्रदीपदादा कंद, कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदीप भोंडवे, सरचिटणीस पै. योगेश दोडके, पै. मेघराज कटके, पै. आबासाहेब काळे, आंतरराष्ट्रीय पंच शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित पै. विलास कथुरे, जाणता राजा कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक पै.सचिन पलांडे, पै. युवराज पोकळे, पै. सचिन कोरडे, पै. तानाजी जाधव. व पै. जिवन लगड हेही उपस्थित होते.
—————–
स्पर्धेतील प्रमुख आकर्षण…
या स्पर्धेत पै. शिवराज राक्षे, पै. बाला रफीक, पै.पृथ्वीराज पाटील या तीन महाराष्ट्र केसरी विजेत्यांसह पैं.नरेंद्र गायकवाड, पैं.सिकंदर शेख, पै.माऊली कोकाटे, पै.प्रकाश बनकर या मल्लांच्या लढती हे प्रमुख आकर्षण असणार आहेत.
……….……….
“नगर रोडवर पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी किताबाची स्पर्धा होत आहे. या स्पर्धेचे नियोजन अतिशय देखण्या स्वरुपात करण्याचा आमचा मानस आहे. २००९-१० मध्ये आम्ही हिंदकेसरी स्पर्धा घेतली होती. त्यामुळे कुस्ती स्पर्धा भरविण्याचा अनुभव आहे. महाराष्ट्रातील सर्व पैलवान आंनदी होतील, अशा स्वरुपात स्पर्धेचे आयोजन होईल.”
प्रदिपदादा कंद, स्वागताध्यक्ष व संचालक – पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक.
—————–
“सलग सहा दिवस या स्पर्धेचा थरार रंगणार असून, राज्यभरातील मल्ल एकमेकांशी दोन हात करणार आहेत. ३५ जिल्ह्यातील आणि ११ महापालिकामधील ४६ जिल्हा तालीम संघातील ९०० ते ९२५ मल्ल या स्पर्धेत सहभागी होत आहेत. यासह महाराष्ट्र केसरी वजनगटामध्ये नामांकित ४० मल्लही सहभागी होणार आहेत. अतिशय रंजक अशा लढती पाहण्याची संधी आहे. आपल्या मल्लांनाही या स्पर्धेचा निश्चित फायदा होणार आहे. उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्त्या पाहण्याची संधी मिळणार आहे,”
पै. संदीपआप्पा भोंडवे, कार्याध्यक्ष, कुस्तीगीर संघ.
(सविस्तर वृत्त पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)
https://youtu.be/p1q3_3NiFCs?si=Pr8jLInm1ix1RnwK